खडकदेवळा, ता. पाचोरा : परिसरातील शेतकरी वर्गाने जेमतेम पाण्यावर लागवड केलेल्या कपाशी पिकाचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परिसरातील शेत शिवारात दबा धरून बसणारे वन्यप्राणी पिकांचे प्रचंड नुकसान करीत असून सर्वेक्षण करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेतयावर्षी निसर्गाने दगा दिल्याने शेतकरी आधीच हतबल झाला आहे. त्यात हा प्रकार घडत आहे. यातच बोंड अळीने शेतकऱ्यांचा कापूस पूर्णत: वाया गेला. दरम्यान, अवकाळी वादळी पाऊस आणि गारपिटीनेही शेतमालाचे नुकसान झाले. जेमतेम पाण्यावर शेतकऱ्यांनी पिके शेतात उभी केली असताना वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला. दिवसरात्र शेतात काबाडकष्ट करूनही पिकांची मातीच होत आहे. सरकार शेतामालाला भावही देत नाही. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. सध्या होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी स्वत:चा जीव धोक्यात घालून वन्य प्राण्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करीत आहे. पिकांच्या रक्षणासाठी जागली सुरू आहे.वन्य प्राण्यांकडून भरदिवसा उभे पीक उद्ध्वस्त केले जात आहेत.शेतांमध्ये रानडुक्कर, रोही अशा प्रकारच्या वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात धुडगूस सुरू आहे. ही बाब पाहता या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त लावण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. यासाठी वन विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 6:46 PM