लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शिरसोली येथील तान्हाजी नथ्थू बिरारी ६३ यांना मंगवारी रात्री श्वास घेण्यास त्रास होत असताना त्यांची ऑक्सिजनची पातळी खालावली असताना उपचारासाठी त्यांची व नातेवाइकांची मध्यरात्री फरपट झाली. शासकीय यंत्रणेत बेड नसल्याने अनेक रुग्णालये फिरूनही त्यांना कोणी दाखल करून घेत नव्हते, बुधवारी त्यांना जळगावातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या पुढाकाराने त्यांच्यावर योग्य उपचार सुरू झाले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने त्यांना परत पाठविण्यात आले. अशा स्थिती खासगीतही जागा उपलब्ध नव्हती, अशा वेळी जायचे कुठे हा प्रश्न नातेवाइकांसमोर होता. रात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी सिटी स्कॅन करून रात्र त्याच ठिकाणी काढून बुधवारी सकाळी जळगावातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी व्हेंटीलेटर खाली नसल्याने ती एक अडचण होती. अखेर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सूत्रे फिरविल्यानंतर या ठिकाणी व्हेंटीलेटर उपलब्ध झाले व बिरारी यांना उपचार मिळाले.