लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात शस्त्र परवान्यांची फॅशन आहे. सध्या जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये १२८० शस्त्र परवाने देण्यात आले आहे. त्यातही विविध व्यावसायिक, राजकीय नेते यांचा समावेश आहे. त्यासोबतच काही प्रमाणात नेमबाजीच्या खेळाडूंनादेखील परवाने देण्यात आले आहेत.
अनेकांना स्वसंरक्षणाची गरज भासते. त्यामुळे त्यांनी शस्त्र परवाने मिळवले आहेत. जिल्ह्यात सध्या १२८० शस्त्र परवाने देण्यात आले आहेत. जिल्ह्यात बहुतेक शस्त्र परवाने हे जळगाव शहरात आहेत. त्यात हॉटेल व्यावसायिकांनी शस्त्र परवाने जास्त प्रमाणात घेतले आहेत. त्यासोबतच सिक्युरिटी एजन्सीजकडेदेखील शस्त्र परवाने आहेत. त्यांच्याकडे शस्त्रे देखील आहेत. ही सर्व शस्त्रे लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात स्थानिक पोलीस ठाण्यांकडे जमा केली जातात.
शस्त्र परवाना कसा काढायचा
शस्त्र परवाना काढण्यासाठी किचकट प्रक्रियेतून जावे लागते. त्यासाठी आधी शस्त्र हाताळण्याच्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र दिले जाते. तसेच शस्त्र सुरक्षीत ठेवण्यासाठी आपल्याकडे जागा आहे का? हे देखील अर्जात दाखल करावे लागते. त्यासोबतच ज्याच्या नावाने शस्त्र परवाना घ्यायचा आहे. त्याची शारीरीक तंदुरुस्ती देखील सिद्ध करावी लागते. पोलीस अधीक्षक कार्यालयाचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यासोबतच ओळखपत्र, फोटो पुरावा, जन्म तारखेचा पुरावा ही कागदपत्रे सादर करावी लागतात.
- जिल्ह्यात शस्त्र परवाने १२८०
शस्त्र सांभाळणे कठीण :
१) जिल्ह्यात सध्या १२८० जणांकडे परवाना आहे. मात्र हे परवाना असलेले शस्त्र सांभाळणे कठीण असते. जुन्या शस्त्रांमध्ये लॉक करण्याची सोय नसते. त्यामुळे या शस्त्रांमधून अनावधानाने गोळी सुटु शकते. त्यासोबतच रिव्हाॅल्व्हर आणि मॅग्जीन असलेले पिस्तुल यांची काळजी घ्यावी लागते. मॅग्झीन असलेले पिस्तुलांमध्ये गोळी कधीही लॉक होऊ शकते. मात्र आता नव्याने आलेल्या पिस्तूलला लॉकींगची सोय असते. त्यात लॉक उघडल्यावर आणि ट्रिगर दाबल्यावरच गोळी सुटते.
२) अनावश्यक व्यक्तींना शस्त्र परवाने दिल्यामुळे गुन्हे वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यात नव्याने शस्त्र परवाने देतांना काटेकोरपणे दिले जात आहेत.
चार वर्षात परवाने कमीच
तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी शस्त्र परवाने देतांना काळजी घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. ही स्थिती अजूनही कायम आहे. गेल्या चार वर्षात शस्त्र परवाने देण्याची संख्या देखील कमी आहे. गेल्या काही वर्षांमध्ये फक्त गरजेपुरते खेळाडू किंवा इतरांना परवाने दिले जात आहेत.
नियम आणखी कडक करण्याची आवश्यकता :
जिल्ह्यात सध्या १२८० शस्त्र परवाने देण्यात आले आहेत. परवाने घेणाऱ्यांमध्ये बहुतांश जण हे व्यावसायिक आणि राजकारणी आहेत. परवानाधारक शस्त्रांनी आतापर्यंत गुन्हे झाल्याचे कधीच समोर आलेले नाही. असे असले तरी देखील परवाने देतांना जिल्हा पातळीवर नियम आणखी कडक करण्याची गरज आहे.