आज पौष शुक्ल एकादशी म्हणजेच पुत्रदा एकादशी. सर्व वर्षातील एकादशीमध्ये ‘पुत्रदा एकादशी’ ला विशेष महत्व आहे. पुराणांत या एकादशीबाबत सविस्तर कथा आहे. या एकादशीच्या व्रत प्रभावाने योग्य संतान प्राप्ती होते, अशी मान्यता आहे. या दिवशी सृष्टीचे पालनकर्ता विष्णूची आराधना केली जाते. महाराष्ट्रातील वारकरी परंपरेत एकादशी व्रतास अनन्य महत्व आहे. एकादशी व्यतिरिक्त कोणताही उपवास करू नये, अशीही विचारधारा वारकरी संप्रदायात आहे. संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे, ‘व्रत करा एकादशी।’ एकच व्रत सांगितले आहे. भगवान श्रीविष्णूस एकादशीचे व्रत अतिप्रिय आहे.एकादशीच्या व्रतास वैज्ञानिक आधारदेखील सांगण्यात आलेला आहे. शरिरात ७५ टक्के पाणी आहे. वैज्ञानिक दृष्टीने बघितले असता, आपले मस्तिष्क, आपल्याव्दारे ग्रहण केलेले अन्न समजण्यासाठी ३ ते ४ दिवस लागतात. अमावस्या व पौर्णिमाच्या दिवशी वायुमंडलीय दाब पृथ्वीच्या चारही बाजूंनी जास्त होत असतो. अशातच एकादशीच्या दिवशी उपवास किंवा व्रत केल्यामुळे सकारात्मक प्रभाव अमावस्या व पौर्णिमा या तिथीपर्यंत मिळत असतो. ज्यामुळे मनाची चंचलता कमी असते, डिप्रेशन किंवा तणाव याची समस्या उद्भवत नाही. एकाग्रता वाढीसाठी उपयुक्त आहे.अशाप्रकारे एकादशीचे धार्मिक व वैज्ञानिक महत्व आहे. याचा अनुभव एकादशी व्रत केल्यानेच मिळू शकतो. एकादशीच्या दिवशी खोटे बोलू नये की ज्यामुळे मन दुषित होते, क्रोध करू नये, पान खाऊ नये वगैरे नियम सांगितले आहेत. या दिवशी भजन, कीर्तनात वेळ घालवावा. या व्रताने पवित्र आचार व विचार होतात. प्रभू भक्तीत लीन होऊन एकादशी व्रत करावे.- डॉ. कैलास पाटील, पिंपळेसीम, ता. धरणगाव
‘व्रत करा एकादशी’...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 10:08 PM