अमळनेर,दि.3-: महाराष्ट्र शासनाकडून पतसंस्था ठेवीदारांना त्यांच्या ठेवी विनाअट परत कराव्यात या मागणीसाठी ठेवीदारांतर्फे बुधवारी सकाळी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले.
जळगाव जिल्ह्यात 2007 पासून पतसंस्था ठेवीदारांचा ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे. अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही. पतसंस्था ठेवीदारांना आतार्पयत राज्य शासनाने दिलेल्या 200 कोटी अर्थसहाय्याशिवाय कुठल्याही प्रकारे ठेवीदारांना पैसा मिळालेला नाही. 200 कोटींपैकी 25 ते 30 कोटी रक्कम वाटपविना शिल्लक आहे.
सहकार खात्याने एकही पतसंस्थेची 100 टक्के कर्ज वसुली करून, 100 टक्के ठेवी ठेवीदारांना परत केल्या नाही. कर्ज वसुली करण्याची क्षमता असूनदेखील कर्ज वसुली करून ठेवीदारांना ठेवी परत करण्याची मानसिकता नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे लाक्षणिक उपोषण करण्यात आल्याचे ठेवीदारांनी सांगितले आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या ठेवी विनाअट परत कराव्यात व जिल्ह्यातील ठेवीदारांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यावर डॉ. रूपेश संचेती, उमाकांत नाईक, अॅड. प्रकाश बडगुजर, अॅड. विजय देवरे, अॅड.राजेंद्र कुळकर्णी, रामभाऊ सैंदाणे, निळकंठ पाटील, देवीदास बिरारी,परमानंद वाणी, विजय बारी, रामभाऊ पाटील, पद्माकर मुंडके आदींच्या स्वाक्ष:या आहेत. जवळपास 50 ते 60 स्त्री-पुरूष महिला ठेवीदार लाक्षणिक उपोषणाला बसले आहे.