संजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : बाप दूर सुरतला कामाला.... आईचा उजवा हात हलका पडलाय... परिस्थिती चांगली असती तर कशाला भंगार गोळा केले असते... कसले ऑनलाईन शिक्षण... अशी व्यथा एका चिमुकल्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
खरंच बालकांचे मोफत व सक्तीचे शिक्षण होतेय का? असा प्रश्न समाजाला पडला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर तीन चिमुकली पोत्यात भंगार गोळा करीत होती. लोकमत प्रतिनिधीने ऑन दि स्पॉट रिपोर्ट घेतला. तिसरी, चौथी, पाचवीतील तीन मुले प्लास्टिक बाटल्या, दारू, बीअरच्या रिकाम्या बाटल्या गोळा करीत होती. त्यातील मोठ्या मुलाला विचारले असता त्याने शहरातील एका शाळेत तिघे शिकत असल्याचे सांगितले. त्यातील एकाने तर माझे नाव दोन शाळांमध्ये असल्याचे सांगितले.
वडील काय करतात असे विचारले असता त्याने केविलवाण्या चेहऱ्याने सांगितले की, वडील सुरतला असतात. तीन-चार महिन्यांनी येतात. आईला एकाच वेळी मुंगूस आणि साप चावल्याने उजवा हात लुळा पडला आहे. त्यामुळेच भंगार गोळा करावे लागते. माझी बहीण सातवीच्या वर्गात शिकते, तीदेखील वीटभट्टीवर जाते. ५०० विटा वाहिल्या की ७५ रुपये रोज मिळतात. मला भंगार गोळा केल्यानंतर दीडशे ते दोनशे रुपये मिळतात. त्यातून या दोन्ही लहान्यांना हिस्सा द्यावा लागतो. ऑनलाईन शिक्षण नाही घेत का? असे विचारल्यावर घरी साधा मोबाईल आहे. नवा मोबाईल जर घेतला तर मला चोरून आणला म्हणून चोर ठरवतील, असेही त्याने सांगितले.
कधी खूप भंगार सापडते, तर कधी काहीच सापडत नाही. सकाळपासून प्लास्टिक व बाटल्या गोळा करून थकल्यानंतर त्यांनी आपल्याजवळील पैशातून कोपऱ्यात एका बाकावर बसून चहाचा आस्वाद घेतला अन् त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवादेखील दूर झाला. एकीकडे हॉटेल आणि मिठाईच्या दुकानावर अमळनेरात काही मुले भीक मागताना, फुकटचे खायला मागताना आढळून येतात. मात्र, प्रामाणिकपणे कष्ट करून, आपल्याच पैशांनी चहा पिऊन भूक भागविणाऱ्या या चिमुकल्यांचे साऱ्यांनाच कौतुक वाटले.
शासन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करते, बालमजुरी प्रतिबंधक कायदाही अमलात आणला, बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण आहे, समाजात अनेक दानशूर व्यक्ती आहेत, दररोज वर्तमानपत्रात देणगीदारांचे कार्य छापून येते. तरीदेखील अमळनेर शहरात असे विसंगत चित्र दिसून आले.