जळगाव : प्रेम प्रकरण सुरु असताना प्रियकर प्रत्येक गोष्ट ऐकायचा..लाड करायचा, प्रेमविवाहानंतर मात्र प्रियकर पतीच्या भूमिकेत आला. वागणुकीत बदल झाला. त्यात सासु सासऱ्यांकडून सतत टोचून बोलणे यामुळे ‘इगो’ दुखावलेल्या या तरुणीने सहा महिन्याच्या बाळाला घेऊन घर सोडले..ही माहिती मिळताच पती व सासरच्यांच्या डोक्यात नको ते विचार घोंगावू लागले..शोध घेऊनही तरुणी सापडत नसल्याचे पोलिसांकडे धाव घेतली. तरुणी एमबीए झालेली तर तिचा पतीही सिव्हील इंजिनियर..घटनेचे गांभीर्य ओळखून यंत्रणाही कामाला लागली अन् दोनच दिवसात तरुणीला शोधून काढले.
या अजबगजब प्रेमविवाह झालेल्या तरुण-तरुणीच्या संसारात ‘इगो’ आडवा आला अन् तेथून वादाची सुरुवात झाली.
रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्याला असलेल्या मुकेश व रेखा (दोघांची काल्पनिक नावे आहेत) या दोघांचे प्रेमप्रकरण सुरु होते. त्यातून दोघांनी प्रेमविवाह करुन नव्या आयुष्याला सुरुवात केली. या संसाराच्या वेलीवर ‘खुशी’ (मुलीचे काल्पनिक नाव) जन्माला आली. सुरुवातीच्या काळात संसार सुरळीत चालला. नंतर सासु-सासरे यांच्या वागणुकीत बदल झाला. त्यांच्याकडून सतत टोमणे मारण्याचे प्रकार सुरु झाले, हे होत असताना पती हा काहीच बोलत नव्हता. पती हा पूर्वीसारखा राहिला नाही, त्याच्याही वागणुकीत बदल झाला. एकीकडे आई, दुसरीकडे बायको या द्विधा मनस्थिती सापडल्याने पतीची कोंडी झाली.
आई वडिलांच्या संस्कारावर बोलले अन् तेथे ‘इगो’ दुखला
घरातील वागणुकीबाबत सासु-सासरे यांच्याकडून सतत टोमणे सुरु असतानाच तुझ्या प्रसुतीचा इतका खर्च केला तरीदेखील तुझं वागणं असच आहे, तुझ्या आई, वडिलांनी संस्कार दिलेले दिसत नाही असा शब्द सासूबाईंनी उच्चारला अन् तेथेच रेखाचा ‘इगो’ दुखावला त्याच्या दुसऱ्याच क्षणाला १६ फेब्रुवारी रोजी रेखाने घर सोडले. कुठे तरी बाहेर गेली असेल समजून सासु-सासऱ्यांनी तिचा शोध घेतला ना पतीने..रात्र झाली, दिवस उजाळला तरी रेखा घरी आली नाही व मोबाईलही लागत नसल्याने घरात चिंतेने सर्वांनाच ग्रासले. काय झाले असेल, तिने काही बरे वाईट केले असेल का असे एक ना अनेक विचारांचे घर मनात निर्माण झाले. तीन दिवस शोध घेऊनही तपास न लागल्याने शेवटी सासु,सासरे व पतीने रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून निरीक्षक अनिल बडगुजर यांची भेट घेवून संपूर्ण घटनाक्रम कथन केला. १९ रोजी रेखा हरविल्याची नोंद करण्यात आली.