जळगाव: रावेर येथून जवळच असलेल्या मांगलवाडी येथील शेतमजुरी करणाऱ्या ५९ वर्षीय बाबूराव कोळी यांनी आपल्या २९ वर्षीय किडनी विकाराने त्रस्त झालेल्या मुलीला वाचवण्यासाठी आपली किडनी दान करत तिला जीवदान दिले. मुलीचे प्राण वाचवण्यासाठी किडनी दान करणाऱ्या या बापावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बाबूराव कोळी यांची मुलगी रूपाली योगेश कोळी (साळुंखे) (रा. चिंचोली, ता. यावल) या तरुणीच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याने अडीच वर्षांपासून ती डायलिसिसवर होती. मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमधील डॉ. हार्दिक शाह यांच्याकडे तिचे उपचार आणि डायलिसिस सुरू होते. मुलीच्या वेदना आणि दुःख आई-वडील अगदी जवळून अनुभवत होते.
दरम्यान, वडील बाबूराव कोळी यांनी मुलीला किडनी देण्याचा संकल्प केला. वडिलांच्या दातृत्वामुळे मुलीचा पुनर्जन्म झाला. पदरमोड करीत त्यांनी सर्वस्व पणाला लावले. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. रूपालीला एक ६ वर्षांची मुलगी आहे.