पिता-पुत्र गोविंद आणि तोताराम महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:37 PM
प्रकाशा येथील प्रा. मंगला सखाराम चौधरी यांनी या विषयाचा शोध जागर पीएच.डी.साठी सुरू ठेवला आहे.
ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 20 - खानदेशच्या आध्यात्मिक आकाशातले हे पिता-पुत्र म्हणजे देदिप्यमान तारकदळ होत. खानदेशच्या या संत परंपरेत अठरा पगड समाजातील संत सत्पुरुष आढळतात, हे एक विशेष होय. आपल्या भक्ती आणि सदाचाराने सामाजिक जीवन ढवळून काढणारे आणि ईश्वरसानिध्य पोहोचविण्यासाठी सातत्याने धडपड करणारे पिता-पुत्र म्हणून खानदेशच्या संतांच्या मांदियाळीचा विचार करताना यांचे कृतज्ञ स्मरण राखावे लागते. प्रकाशा येथील प्रा. मंगला सखाराम चौधरी यांनी या विषयाचा शोध जागर पीएच.डी.साठी सुरू ठेवला आहे. त्यांचे अभिनंदन. खानदेशच्या संत परंपरेचा विचार करू जाता पिता-पुत्र म्हणून ज्या जोडीचे स्मरण अनिवार्य आहे, असे आहेत श्री गोविंद महाराज आणि श्री तोताराम महाराज. श्री गोविंद महाराज यांचा जन्म पिंपळगाव हरेश्वर येथे 1782 साली झाला असावा. वडील ङोंडुला पाटील आणि आई काशीबाई. संशोधनाअंती महाराजांचा जन्म उत्राण येथे झाला असल्याचे प्रमाण मानन्यात येते. गोविंद महाराज हे विठ्ठलोपासक वारकरी होते. गोविंद महाराजांचा जन्म गुजर्र समाजात झाला. महाराजांच्या जन्मानंतर तत्कालीन अंधाधुंदीच्या राजकीय परिस्थितीमुळे आपल्या कुटुंबातील मुला-माणसांना गावोगावी घेऊन जावे लागले. ती संपूर्ण हकिकत समर्थ गोविंद महाराज चरित्रातून सविस्तरपणे आली आहे. गोविंद बुवा 1816 साली धाता नाम संवत्सरात भाद्रपद शुद्ध चतुर्दशीस जामनेरहून पिंपळगावी आल्याचा उल्लेख आढळतो. आयुष्यभर महाराज तिथेच राहिले आणि पुढे तेथेच समाधी घेतली.भाविक जनांच्या मते गोविंद महाराज हे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अवतार मानले जातात. अवलिया आणि निरीच्छ वृत्तीने राहणा:या गोविंद महाराजांना वडील वेडा म्हणून हाक मारायचे. महाराजांनी आपल्या नाममुद्रेत ‘गोविंद म्हणे’ याऐवजी ‘वेडा म्हणे’ असा बदल करून घेतला. तुकाराम महाराजांप्रमाणेच आपणही स्वप्नोपदिष्ट असल्याचे महाराज सांगत. गोविंद महाराजांच्या गुरूंचे नाव पांडुरंगाने रायाजी असल्याचे सांगितले होते. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षीच महाराजांना गुरुपदेश लाभला होता आणि त्या वेळेपासूनच त्यांनी अभंग रचनेला सुरुवात केली होती. प्रपंचात राहूनही ते विरागी होते. श्री क्षेत्र उत्राण येथे श्री रायाजी बुवा नावाचे दखनी मराठा समाजाचे एक सद्गृहस्थ होते. त्यांच्याकडे ज्ञानेश्वरीचे नित्य पारायण सुरू असायचे. त्यांना गुरुस्थानी मानत असल्यामुळे गोविंद महाराज तेथे जाऊन बसत असत. महाराजांचे ‘उडीचे अभंग’ प्रसिद्ध आहेत. श्री विठ्ठलाच्या दर्शनार्थ पंढरपूर येथे गेल्यावर उंचच उंच उडी मारून भक्तजन विठोबाला नमन करतात. या कारणासाठी हे उडीचे अभंग गोविंद महाराजांनी रचले आहेत. यातून भक्त आणि वारकरी जनांसाठी भक्तीचा एक उमाळा जागत राहिला होता. त्यांच्या प्रकाशित साहित्यात प्रामुख्याने नवविधा भक्तियोग, अभंगवाणी, गोविंद महाराज रचित शेज आरती आणि काकडा आरती यासारखे साहित्य प्रकाशित आहे. जामनेर येथील चंद्रकांत मोरे यांनी ‘श्री गोविंद समर्थ’ नावाने प्रसिद्ध केलेला ग्रंथ जिज्ञासूंनी अवश्य अभ्यासावा असा आहे. श्री तोताराम महाराजांचा कार्यकाळ 1813 ते 1854 असा सांगता येईल. प्रकाशा येथे तोताराम महाराजांचे मंदिर आहे. येथे नियमितपणे उत्सव होतात. गोविंद महाराज यांचे चिरंजीव तोताराम महाराज. तोताराम महाराजांना नारायण, केशव, माधव व पांडुरंग अशी मुले. पांडुरंगाला वामन बाबा नावाचा एक पुत्र झाला. वामन बाबांचे माधव व रामदास हे पुत्र, तर माधवरांचे रामकृष्ण. रामकृष्ण यांचे चिरंजीव शिवानंद होत.श्री तोताराम महाराजांनी 246 अभंग लिहिले. गोविंद महाराजांचा चरित्रग्रंथ 65 अध्यायात रचला आहे. हा ग्रंथ अभंग आणि ओवी शैलीत आहे. सुमारे नऊ हजार ओव्यात या ग्रंथाची रचना झाली आहे. अतिशय प्रासादिक शैलीतला हा ग्रंथ चरित्र वा्मय ग्रंथ परंपरेतील एक महत्त्वाचे वळण आहे. महाराजांच्या हिंदी अभंगाची संख्या तीसहून अधिक आहे. महाराजांचे अहिराणीतून अभंग लेखन आढळते.श्री गोविंद महाराजांच्या चरित्र ग्रंथातून समकालिनांचे उल्लेख आढळतात. ही यादी वाचल्यावर हे ध्यानात येते की, अजून अध्ययनाच्या किती अज्ञात वाटांचा शोध घेणे बाकी आहे. या यादीतील संतांची नावे समजून घेणे आवश्यक आहे. या यादीत एरंडोलचे रावसाहेब, यावल येथील गंगाराम बुवा, शेंदुर्णीचे गणोबा, कापूसवाडीचे महाळोजी बाबा, निंबाळकरांचे सद्गुरू योगाभ्यासी संत निर्भिक योगी अण्णासाहेब, चाळीसगावचे नथुबुवा, गरबडनाथ, तापीनाथ, तापीनाथ सूत हिरानाथ, जळगाव जामोदचे देवराज बुवा, येवला येथील जोतीबुवा, व:हाडातले तुकाराम बुवा, तापी तटावरील नाथ सांप्रदायिक वैराग्य संपन्न चंडीनाथ बुवा, नाशिकचे दाजी दीक्षित ही मंडळी गोविंद महाराजांच्या दर्शनार्थ येत असल्याचा उल्लेख येतो. श्री तोताराम महाराज यांच्या ज्ञानशाखा आजही पाळधी, जामनेर, पिंपळगाव हरेश्वर आणि प्रकाशा येथे कार्यरत आहेत. - प्रा.डॉ. विश्वास पाटील