जळगाव तालुक्यातील सुभाषवाडी येथील माहेर असलेल्या रेखा हिचा ११ वर्षांपूर्वी मोहाडी, ता. जळगाव येथील रमेश राठोड याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर पती-पत्नीचा संसार सुखाने चालला. विद्या व प्रशांत ही फुले त्यांच्या संसारात उमलली. त्यामुळे संसार अधिकच बहरला होता. मात्र अचानक काही महिन्यांपासून या संसारात मिठाचा खडा पडला व त्यातून वारंवार वादाची ठिणगी पडत गेली. मंगळवारी दुपारी दोन वाजता वडील धनराज चव्हाण यांना सुभाषवाडीत असताना मुलीने जाळून घेतल्याचा फोन आला. त्यांनी लागलीच पत्नी विमलबाई यांना सोबत घेऊन जिल्हा रुग्णालय गाठले. ७० टक्के जळाल्याने रेखाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तिला शवविच्छेदनगृहात नेण्यात आले होते. तेथे मुलीचा मृतदेह पाहताच आईने प्रचंड आक्रोश केला. बाहेरदेखील त्यांचा आक्रोश थांबत नव्हता तर वडिलांनी अचानक असे काय झाले की मुलगी जगातून गेली? सासरच्यांनीच तिला जाळून मारल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सुनील सोनार व शांताराम पाटील यांनी पंचनामा केला तर जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे व मोहाडीचे सरपंच धनराज सोनवणे यांनी दोन्ही कुटुंबांत मध्यस्थी घडवून आणत या प्रकरणावर पडदा टाकला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लेकीच्या मृत्यूने वडिलांचा संताप, आईचा आक्रोश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 4:20 AM