कोरोनाने घेतला दोघांचा बळी : भोद गावावर शोककळा
जळगाव : मुलाच्या अस्थिविसर्जनाच्या दिवशी पित्याचा मृत्यू झाल्याची घटना भोद (ता. धरणगाव) येथे घडली. पाच दिवसांत पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. उज्ज्वल प्रताप पाटील (वय ४७) व प्रताप पंडित पाटील (६८) अशी दोघांची नावे आहेत.
शिवसैनिक तथा भोद गावाचे उपसरपंच उज्ज्वल पाटील यांना गेल्या महिन्यात एका विवाह समारंभात कोरोनाची लागण झाली. त्रास जाणवू लागल्याने त्यांना जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावली. त्यांना दुसऱ्या दवाखान्यात हलविण्यात आले. १५ दिवस रुग्णालयात उपचार चालले; परंतु त्यांची प्रकृती गंभीरच होती. ३ एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. याच काळात त्यांच्या वडिलांनाही बाधा झाली. त्यांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ५ एप्रिल रोजी उज्ज्वल पाटील यांच्या अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम होता. त्याच दिवशी वडील प्रताप पाटील यांचीही प्राणज्योत मालवली. वडिलांच्या आधी मुलाचा मृत्यू; त्यातही अस्थिविसर्जनालाच पित्याचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
उज्ज्वल पाटील उपसरपंच
उज्ज्वल पाटील हे शिवसैनिक व गावाचे उपसरपंच होते. त्याशिवाय ठिबक नळी उत्पादनाचे त्यांच्या मालकीचे तीन कारखाने आहेत. तसेच धरणगाव येथे होलसेल विक्रीचे दुकान आहे. तालुक्यात पाटील कुटुंबाचा नावलौकिक आहे. उज्ज्वल पाटील यांच्या पश्चात पत्नी शैला, मुलगा तुषार, मुलगी पूजा, भाऊ व बहीण असा परिवार आहे.