(डमी ८३२ )
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाने फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत थैमान घातले होते. राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत होते, त्यामध्ये दुर्दैवाने जळगाव जिल्हा आघाडीवर होता. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर प्रशासनाने नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले असून, गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट होत आहे. मात्र, एकीकडे घट सुरू असताना, दुसरीकडे कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना अजूनही त्रास जाणवत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल वाढले असून, त्रासावर प्राथमिक उपचार करून घेण्यासाठी विचारणा केली जात आहे.
कोरोनावर मात केल्यानंतर देखील अनेक रुग्णांना महिनाभर काही ना काही त्रास जाणवत असतो, यासाठी जिल्हा प्रशासनाने कोरोनानंतर त्रास होत असलेल्या रुग्णांसाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान देखील जिल्हा प्रशासनाकडून ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली होती. आता एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना, दुसरीकडे मात्र कोरोनावर मात केल्यानंतर अनेक रुग्णांना डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा, थकवा जाणवत आहे. हेल्पलाईनवर अशा रुग्णांचे कॉल वाढले असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तज्ज्ञांकडून अशा रुग्णांना आवश्यक औषधोपचाराबाबत प्राथमिक माहिती पुरविली जात आहे.
थकवा वाढलाय, काय करू?
- हेल्पलाईनवर दिवसाला येत असलेल्या २० ते ३० कॉलपैकी निम्म्या कॉलमध्ये रुग्णांची समस्या एकच राहत आहे. अनेक रुग्णांना कोरोना होऊन महिना झाल्यावर देखील थकवा जाणवत आहे. यामुळे कॉल आल्यावर अनेक रुग्णांचा पहिला प्रश्न हाच असतो की, थकवा वाढलाय, काय करू ?, त्यावर डॉक्टरांकडून प्राथमिक औषधोपचाराविषयी माहिती दिली जात आहे.
- या हेल्पलाईनवर कोरोनावर मात केलेल्या रुग्णांसह लसीकरण घेऊन ताप आलेल्या रुग्णांचेही कॉल येत असतात. लस घेतल्यानंतर ताप आला आहे, काय करू?, डोके दुखत आहे, काय करू? असे प्रश्न रुग्णांकडून केले जात आहेत. तसेच इतर आजारांविषयीदेखील अनेक रुग्ण या हेल्पलाईनवर विचारणा करत असल्याची माहिती जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पहिल्या लाटेनंतर आलेले एकूण कॉल - ७८९
दुसऱ्या लाटेनंतर आलेले एकूण कॉल - ९९१
तारीख - कॉल्स - रुग्ण
१ मे - ३१ - २८
१५ मे - ३९ - ३४
१ जून - ४१ - ४०
१५ जून - ५४ - ३५
२० जून - ३० - २३
जळगाव शहरातून सर्वाधिक कॉल्स
जिल्हा वैद्यकीय विभागाने संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णांसाठी ही हेल्पलाईन सुरू केली असली तरी, या हेल्पलाईनवर सर्वाधिक कॉल्स हे जळगाव शहरातूनच येत असतात. जळगाव ग्रामीणमधून देखील काही कॉल्स येत असतात. मात्र, इतर तालुक्यांमधून फारसे कॉल्स येत नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.