लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ब्रेक द चेन दरम्यान किराणा दुकानाच्या वेळा आता सकाळी सात ते ११ वाजेपर्यंत मर्यादित केल्यास मालाच्या आवक-जावकवर परिणाम होऊन कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे व भाववाढदेखील होऊ शकते. त्यामुळे याचा पुनर्विचार करावा, अशी मागणी जिल्हा व्यापारी महामंडळाच्यावतीने करण्यात आली आहे.
ब्रेक द चेनमध्ये किराणा दुकान सुरू असल्याने त्या नावाखाली अनेक जण बाहेर फिरत आहे, असे सांगत सोमवारी राज्य सरकारने किराणा दुकानांच्या वेळांवर देखील मर्यादा आणली. यामध्ये किराणा दुकाने सकाळी सात ते ११ या वेळेत सुरू राहणार असल्याचे म्हटले आहे. याविषयी जिल्हा व्यापारी महामंडळाने आक्षेप घेत किराणा दुकानांच्या वेळेला निर्बंध लावल्यास मालाच्या आवक-जावकवर परिणाम होऊन त्याची कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, असे म्हटले आहे. यासोबतच मालाची भाववाढ होऊन त्याचा भार ग्राहकांवर येऊ शकतो. इतकेच नव्हे दुकाने कमी वेळ सुरू राहिल्याने या ठिकाणी अधिक गर्दी होईल व संसर्गाची भीतीदेखील वाढू शकते. त्यामुळे राज्य सरकारने या निर्णयाचा विचार करावा, अशी मागणी जिल्हा व्यापारी महामंडळाच्यावतीने सचिव ललित बरडिया यांनी केली आहे.