अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात शिवसेना आता आपले पाय घट्ट रोवून संघटनेच्या माध्यमातून व विविध स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेऊन आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतांनाच, दुसरीकडे मात्र शिवसेनेतील अंतर्गत कलह देखील आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. गेल्या आठवड्यात जळगाव लोकसभा मतदार संघासाठी जिल्हाप्रमुख यांची नियुक्ती झाल्यानंतर शिवसेनेत वादाला तोंड फुटले असून डॉ.हर्षल माने यांच्या नियुक्तीवरून पारोळ्यात स्थानिक आमदारांसह अनेक शिवसैनिक नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
डॉ.हर्षल माने यांची जळगाव लोकसभा मतदारसंघातील चाळीसगाव, पारोळा व पाचोरा या तालुक्यांसाठी जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, ही नियुक्ती करताना स्थानिक शिवसैनिकांना व आमदारांना देखील विश्वासात घेण्यात आले नाही अशी भावना शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्याचेच पडसाद यायला सुरुवात झाली असून डॉ.हर्षल माने यांचे बॅनर अज्ञाताने तोडले आहे. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. माने यांच्या नियुक्तीवरून स्थानिक शिवसैनिक नाराज आहेत. जुन्या व अनेक वर्षांपासून काम करत असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत विश्वासात देखील घेतले गेले नाही तसेच अनेक शिवसैनिक या पदासाठी इच्छुक असताना देखील त्यांचाही विचार पक्षाकडून करण्यात आला नाही असे शिवसैनिकांकडून सांगण्यात येत आहे.
चिमणराव पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न ?
पारोळ्याचे शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांना शह देण्यासाठी पारोळा तालुक्यातूनच नवीन नेत्याला पक्षाचे मोठे पद देण्याची ही खेळी असल्याचीही चर्चा आता शिवसेनेत रंगली आहे. त्यात डॉ. माने हे जरी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य असले तरी शिवसेनेच्या संघटनात्मक कामात डॉ.माने हे दूरच होते. अशा परिस्थितीत त्यांची नियुक्ती करून पक्षाने केवळ जुन्या सैनिकांना डावलण्याची भूमिका घेतली असल्याचाही आरोप शिवसैनिकांकडून केला जात आहे.
जळगाव शहरात ही खदखद सुरू
जळगाव महापालिकेत सत्तांतर होऊन शिवसेनेची सत्ता आली असली तरी शिवसेनेचा संघटनेत मात्र नाराजीचा सूर उमटत आहे. तसेच सत्तांतर यामध्ये जुन्या शिवसैनिकांची भूमिका मोठी असल्याचे सांगत स्वीकृत नगरसेवक म्हणून निष्ठावंत शिवसैनिकांची नियुक्ती केली जावी यासाठी काही जुन्या शिवसैनिकांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. मात्र, काही ठराविक नावांसाठी संपर्कप्रमुख स्वतः आग्रही असल्याने, शिवसेनेच्या एका गटाची नाराजी वाढली आहे. महानगर शिवसेनेत जुने व नवीन शिवसैनिक असा वाद वाढतच असून, महानगर शिवसेनेची नवीन कार्यकारणी घोषित करण्यात यावी अशीही मागणी आता शिवसैनिकांकडून केली जात आहे.