महावितरणचे दुर्लक्ष : शेतकरी बांधवांच्या कामावर परिणाम
जळगाव : तालुक्यातील धानोरा परिसरात शेतातील महावितरणचे विद्युत खांब अनेक ठिकाणी वाकले आहेत. परिणामी हे खांब वाऱ्याने कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असून, महावितरण प्रशासनाचे या प्रकाराकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे.
महावितरणतर्फे कृषी पंपाच्या अति उच्च क्षमतेच्या मुख्य विद्युत वाहिन्या या शेतातूनच टाकण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या महिन्यात झालेल्या वादळी वारे व पावसाळामुळे अनेक ठिकाणी हे खांब वाकले आहेत. मात्र, महावितरणतर्फे अद्याप हे खांब सुरळीत करण्यात आलेले नाहीत. पूर्ण जमिनीच्या दिशेने अर्ध्यापर्यंत हे खांब वाकल्यामुळे जोराने वारा आल्यावर हे खांब कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतात काम करताना शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण होत आहे. तरी महावितरण प्रशासनाने हे खांब कोसळण्यापूर्वी तातडीने सरळ करण्याची मागणी शेतकरी बांधवांतर्फे करण्यात येत आहे.