लोकमत न्यूज नेटवर्क
वरणगाव : येथून जवळच असलेल्या दर्यापुर शिवारातीत साईनगर मधील रहिवाशी संजय त्रिलोकनाथ खन्ना यांनी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी व त्यांचे बंधु आनंत सुर्यवंशी यांचे विरुद्ध पिस्तुल लावून धमकाविल्याप्रकरणी वरणगांव पोलीसांत तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, ५ ऑगस्ट २०२० रोजी फिर्यादी व त्यांची पत्नी दोघे घरी असतांना दुपारी २.०० ते २.३० वाजेच्या सुमारास राजू भागवत सूर्यवंशी व आनंत भागवत सूर्यवंशी दोघे राहणार १५ बंगला हे त्यांच्या सोबत दोन बॉडीगार्ड घेऊन आले. त्यांनी व्याजाचे पैशांच्या देण्याघेण्याचा कारणावरून राजू सूर्यवंशी यांच्याकडील पिस्तुल व दोन बॉडीगार्ड पैकी एका बॉडीगार्डकडे सुद्धा एक मोठी बंदूक होती. राजू सुर्यवंशीने त्यांच्या हातातील पिस्तुल संजय खन्नाच्या डाव्या बरगडीला लावून व त्यांचा भाऊ आनंत भागवत सूर्यवंशी व इतरांनी फिर्यादिस शिवीगाळ करीत मारून टाकण्याची धमकी दिली.
परिस्थिती नाही म्हणून सध्या पैसे देऊ शकत नाही असे बोलताच दोघांनी फिर्यादीच्या पत्नीच्या अंगावरील ३५ हजार रुपये किंमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळ ळसूत्रांची पोत,९५ हजार रुपये किंमतीचे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याच्या दोन बागळ्या,१७ हजार रुपये किंमतीचे ५ ग्रॅम वजनाची सोन्याची एक अंगठी,१३ हजार रुपये किंमतीचे ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स एकूण १,६०,००० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हिसकविले.
या तक्रारीवरून पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ९ रोजी वरणगांव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या आदेशावरून सुर्यवंशी बंंधूंविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादीस संरक्षण
या प्रकरणी पोलीस अधिक्षक यांच्या आदेशावरून वरणगांव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोरसे यांनी फिर्यादी संजय खन्ना यांच्या जीवास धोका असल्याने दोन पोलीस कर्मचारी संजय खन्ना यांच्या संरक्षणासाठी निवासस्थानी तैनात केले आहेत.