जळगाव : गावठी पिस्तूल, चॉपर व तलवार घेऊन आलेल्या सहा जणांनी चक्का सट्टा पेढीवर येऊन चार लाख रुपयांची लूट केल्याची घटना सोमवारी भरदिवसा दुपारी चार वाजता बेंडाळे चौकात घडली. दरम्यान, नंबर दोनचा मामला असल्याने याची पोलीस दप्तरी कुठलीच नोंद नाही. पोलिसांनी मात्र असे काही घडले की नाही, हेदेखील आम्हाला माहिती नसल्याचे सांगितले. मात्र, शहरात सायंकाळी या घटनेची जोरदार चर्चा होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंडाळे चौकातील पानटपरीच्या पाठीमागे सट्टा व्यवसाय चालतो. सोमवारी दुपारी चार वाजता दुचाकीवरून सहा जण या सट्टा पेढीवर आले. त्यांच्यापैकी एकाकडे गावठी पिस्तूल, दुसऱ्याकडे तलवार तर तिसऱ्याकडे चॉपर होते. दोन जण दुचाकीजवळ थांबले तर बाकींच्या पेढीत घुसून शस्त्रांचा धाक दाखविला व पेटीतील रोकड घेऊन पोबारा केला. या पेटीत चार लाखांच्या जवळपास रोकड होती, तेथे उपस्थित असलेल्या एका जणाने तर ९० हजारांचे सोने मोडले होते, त्याचीही रोकड तेथेच होती. दरम्यान, या घटनेनंतर सट्टा पेढी चालकाने पोलिसांना कळविले. शनी पेठचे दोन कर्मचारी व स्थानिक गुन्हे शाखेचे दोन कर्मचारी घटनास्थळावर गेलेही. मात्र, मामला दोन नंबरचा असल्याने गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे सांगण्यात आले. त्यानंतर सोने खरेदी करायला जात असताना रस्त्यात लुटले, अशी तक्रार देण्यावर एकमत झाले; परंतु अखेरपर्यंत सट्टामालकाने काही तक्रार दिलीच नाही. दरम्यान, याबाबत शनी पेठ पोलीस ठाण्याचे ठाणे अमलदार गणेश गव्हाळे यांना विचारले असता अशी माहिती पत्रकारांकडून समजली; परंतु तक्रार द्यायला कोणीच आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, घटनास्थळावर चौकशी केली असता कापड टाकलेल्या जागेत काही तरी घटना घडली इतकेच लोकांनी सांगितले.
कोट...
लुटीबाबत मीही ऐकले. आमचे कर्मचारी चौकशीसाठी गेलेही होते; पण काय प्रकार झाला, हे समजले नाही. पोलिसांतही कोणीच तक्रार द्यायला आले नाही.
-लीलाधर कानडे, प्रभारी पोलीस निरीक्षक, शनी पेठ
कोट...
घटना घडली किंवा नाही तसेच आमचे कर्मचारी गेले किंवा नाही हे मला माहिती नाही. माहिती घेऊन सांगतो.
-किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा