जामनेरच्या रमेश पाटलांचे पायी वारीचे अनुभव
माऊलीच्या वारीत मिळते स्वर्गसुखाची अनुभूती
जामनेरच्या रमेश पाटलांचे पायी वारीचे अनुभव
लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर : पंढरपूरला जाणाऱ्या पायी वारीत चालताना कोणताही थकवा जाणवत नाही. विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ असते. त्यामुळे अभंग, हरिपाठ व मुक्ताई ताटीचे अभंग म्हणत पंढरपूर केव्हा येते हेच कळत नाही. स्वर्गसुखाचा अनुभव म्हणतात तो फक्त माऊलीच्या वारीतच अनुभवता येतो, अशी आठवण येथील रमेश उर्फ भाऊराव शामराव पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली.
पाटील नगारखाना भागातील रहिवासी असून १९९९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा पंढरपूरची पायी वारी केली.
वारकरी पंथाचे अनुयायी असून जामनेर येथील गोविंद महाराज संस्थानचा कारभार त्यांनी सांभाळला. पंढरपूरच्या वारीत त्यांना पत्नी विमलबाईंची साथ लाभली. आजही हे दाम्पत्य नित्य हरिपाठ करतात.
मेहूण येथील आदिशक्ती मुक्ताईची पालखी गेल्या अनेक वर्षांपासून जामनेरमार्गे पंढरपूरला जाते.
दिंडी व वारकऱ्यांचे पुरा भागात आगमन व मुक्काम असतो. दुसऱ्या दिवशी दत्त मंदिरात प्रवचन, किशोर दत्तात्रय पाटील यांच्या घरी माऊलींच्या पादुकांचे पूजन व अभिषेक केला जातो. त्यांच्याकडून वारकऱ्यांना भोजन प्रसाद दिला जातो. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. दुर्दैवाने कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून यात खंड पडला आहे.
रमेश पाटील हे शांताराम लक्ष्मण पाटील व नामदेव धनगर यांच्यासोबत जामनेर येथून पायी वारीत सहभागी झाले. पायी वारीचा अनुभव सांगताना त्यांनी विठ्ठल दर्शनाची लागलेली ओढ सांगितली. साडे पाचशे किलोमीटरचा प्रवास १ महिना १० दिवसांत पूर्ण केला. जामनेर येथून निघतांना अवघे १२ ते १५ वारकरी होतो. वाटेत वारकरी दिंडीत सहभागी होऊ लागले. दिंडी मार्गातील गावात स्थानिक भाविकांकडून चहापान, भोजन आदींची व्यवस्था केली जाते. आधी मार्गातील गावात जेथे मुक्काम ठरलेला असतो त्या ठिकाणी पत्राद्वारे कळविले जायचे. आता मोबाईलची व्यवस्था झाल्याने मोबाईलवरून संदेश दिला जातो. मेहुणचे सुधाकर महाराज यांच्या सोबत वारीत सहभागी होऊन विठ्ठल दर्शनाचा आनंद घेता आला.
बार्शी येथे भगवान मंदिरात मुक्काम व नंतर सात दिवसांनी आषाढ शुद्ध अष्टमीला पंढरपूरला पोहोचलो. नवमीला विश्रांती व दशमीला रात्री पंढरपूरला पोहोचलो. चंद्रभागेत स्नान, पुंडलिकाचे दर्शन, अमळनेरात सखाराम महाराज, गोविंद महाराज यांच्या समाधींचे दर्शन, लोहकुंडात अभिषेक केल्यानंतर विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर वारी पूर्ण केल्याची अनुभूती मिळाली.
-------------------------------------------------
कळस दर्शनानेही मिळते पुण्य
कळसाचे दर्शन घेऊनही वारीचे पुण्य मिळते.
देव जळी स्थळी भरला,
ठाव कोठे नाही उरला
आज इच्छा असूनही प्रकृती साथ देत नसल्याने माऊलीच्या दर्शनाला जाऊ शकत नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. पायी वारीनंतर पाच वेळा आळंदी पर्यंत एसटीने व त्यापुढे पायी वारी पत्नी विमलबाई सोबत केल्याचे त्यांनी सांगितले. काही कारणाने ज्यांना पंढरपूरला जाऊन विठू रायाचे दर्शन घेणे शक्य होत नाही त्यांनी आपल्या गावातीलच मंदिरात दर्शन घेऊन पुण्य मिळवावे असेही त्यांनी सांगितले.
------------------------------------------------