लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आरोग्य सेवा आयुक्तालयाने कोविडग्रस्त महिला आणि कोविड केंद्रातील महिलांच्या सुरक्षेसाठी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीची अंमलबजावणी करण्याचे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.
स्त्री रुग्ण व पुरुष रुग्ण दाखल करताना स्वतंत्र कक्षात दाखल करावेत. स्त्री रुग्णांची तपासणी महिला डॉक्टरांनी करावी, महिला डॉक्टर नसतील, तर पुरुष डॉक्टरांनी स्त्री रुग्णांची तपासणी करताना स्टाफ नर्सच्या उपस्थितीत करावी. स्त्री कक्ष स्वतंत्र ठेवावा.
एका खोलीत दोन किंवा त्यापेक्षा जास्त स्त्री रुग्ण ठेवावेत. त्या कक्षासाठी स्त्री सुरक्षारक्षकाची नियुक्ती करावी. स्वच्छता व इतर कामांसाठी स्त्री स्वच्छता सेवक व स्त्री परिचर यांची व्यवस्था करावी. स्त्री रुग्ण गावाबाहेरील कोविड सेंटर्समध्ये दाखल न करता शहरातील मध्यवर्ती ठिकाणच्या कोविड सेंटर्समध्ये दाखल करावेत. स्त्री कक्षामध्ये पुरुष सुरक्षारक्षक किंवा पुरुष परिचर राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. कोविड सेंटर्ससाठी सीसीटीव्ही व्यवस्था चालू स्थितीत राहील याची काळजी घ्यावी. जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या हालचालीवर देखरेख करता येईल. स्त्री रुग्णांना त्यांचे कक्षात मोबाइल फोन वापरण्याची परवानगी द्यावी, स्त्री रुग्ण दाखल असल्यास त्यांचे नातेवाइकांना रुग्णाशी दररोज १-२ वेळा संपर्क साधण्याबद्दल कळवावे. कोणत्याही परिस्थितीत पुरुष डॉक्टरांनी एकट्याने स्त्री रुग्णास तपासणी करू नये, अथवा स्त्री कक्षात जाताना व रुग्ण तपासताना स्त्री अधिपरिचारिका व स्त्री परिचर यांचे उपस्थितीतच रुग्णाची तपासणी करावी, असेही या नियमावलीत म्हटले आहे.
सदर परिपत्रकानुसार सर्व महिला प्रश्नावर काम करणाऱ्या संघटनांनी , प्रभावी अंमलबजावणी साठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती विधान परिषद यांनी केले आहे.