15 वर्ष वहिवाटीचा रस्ता बंद: वनविभागाचे आडमुठे धोरण
जळगाव, दि.28- रिंगरोडसारख्या शहरातील मध्यवर्ती भागात वनक्षेत्र नसल्याने वनांचे नुकसान होण्याची भिती नसतानाही केवळ अडवणुकीचे धोरण स्विकारत दत्त कॉलनीतील नागरिकांचा गेल्या 15 वर्षापासून वहिवाटीचा रस्ताच बंद करण्याचा घाट वनविभागाने घातला आहे. त्यात ज्या घरांना या रस्त्याशिवाय वापराचा दुसरा रस्ताच नाही, त्यांच्या प्रवेशद्वाराला खेटून कुंपण घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीची भावना असून मनपाने तसेच जिल्हाधिका:यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी रहिवाशांकून होत आहे.
रिंगरोडवर असलेल्या फॉरेस्ट कॉलनीच्या मागील बाजूस लागून असलेल्या दत्त कॉलनीतील 8-10 घरांसाठी खान्देश मिल कॉलनीकडून पिंप्राळा रेल्वेगेट रस्त्याकडे जाणारा रस्ता वनविभागाच्या हद्दीतून 2009 मध्येच वनविभागाच्या संमतीनेच करण्यात आला होता. हा रस्ता वनविभागाची हद्दीच्या काठावरच असून त्याला लागून दत्त कॉलनीतील खाजगी प्लॉट आहेत. त्यामुळे यापूर्वी दोन वेळा वनविभागाने कुंपण केले ते रस्ता सोडून केले होते. नागरिकांना वापरासाठी रस्ता मोकळा सोडण्यात आला होता. मात्र वनविभागाने अचानकपणे आठमुठे धोरण घेत गेल्या 15 वर्षापासून वहिवाट असलेला रस्ता बंद करण्याचा घाट घातला आहे. आमदार भोळे यांनी या ठिकाणी पाहणी करून वनविभागाच्या अधिका:यांशी संपर्क साधला असता वनविभागाची एक इंचही जागा सोडणार नसल्याचे सांगण्यात आले. तर मनपा नगररचना विभागाने जागा वनविभागाची असली तरीही 15 वर्षापासून वहिवाट असल्याने हा वहिवाटीचा रस्ता बंद करता येणार नाही, असे वनविभागाला कळविले आहे. तरीही वनविभागाकडून रस्ता बंद करण्याचा अट्टाहास सुरू आहे.
दोन घरांना सोडली जागा
वनविभागाच्या अधिका:यांनी हे कुंपण आखताना कोप:यावरील दोन बंगल्यांच्या पुढे चार-पाच फुटांची जागा सोडली. तर त्यापुढे मात्र गटारीपासून जेमतेम अर्धाफुटावर कुंपण घालण्यात आले आहे. म्हणजेच वनविभागाकडून उघडपणे भेदभाव सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.