लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : चाचण्यांचे प्रमाण वाढवून त्यातही आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिलेल्या असताना, तसे पत्र असतानाही स्थानिक पातळीवर मात्र, दिवसाला एक हजाराच्या आत चाचण्या हाेत असल्याचे गंभीर चित्र आहे. त्यातही आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या ही ॲन्टीजनपेक्षा कमीच असल्याने नेमके चाचण्यांमध्ये अडचण काय हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यात शनिवारी ६८९ चाचण्यांचे अहवाल समोर आले. यात २४ बाधित आढळून आले तर २८९ आरटीपीसीआर टेस्ट झाल्या. त्यांचे अहवाल उद्या परवापर्यंत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, शनिवारी ४७ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. तर दोन बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील चाचण्यांमध्ये शहराचा मोठा वाटा राहत असल्याने ग्रामीण भागात चाचण्याच होत नसल्याचेही चित्र आहे. त्यामुळे प्रशासन याबाबत नुकताच आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, जिल्ह्यातील चाचण्यांची संख्या ही ३ लाख ५० हजार ४११ वर पोहोचली आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून चाचण्यांची संख्या प्रचंड घटली आहे. बाधित रुग्णच कमी असल्याने चाचण्या घटल्याचे सांगितले जात आहे.
शहरात पाच रुग्ण
शहरात पाच नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून १५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील एका ५९ वर्षीय पुरूष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यासह पाचोरा तालुक्यातील ६८ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आसोदा रोड आणि श्री कृष्ण कॉलनी या भागात रुग्ण आढळून आले आहेत.