पिंपळगाव (हरे.) ता. पाचोरा,दि.18- परिसरात मोसंबी उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होत असून दरवेळेस चांगले उत्पन्न देणा:या या फळांचे भाव यंदा घसरल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
गाव व परिसरात सुमारे 500 हेक्टर शेत जमिनीत मोसंबी बागांची लागवड झालेली आहे तर सुमारे 200 हेक्टर शेत जमिनीत पेरू, सीताफळ, आवळा, डाळींबच्या बागा आहेत. कपाशी पिकापेक्षा मोसंबी बागा परवडतात असा अनुभव असल्याने शेतकरी राजा फलोत्पादनाकडे वळलेला आहे. यंदा मात्र द्राक्ष, टरबूज, आंबे आदी पिकांचे प्रचंड उत्पादन झाल्याने ते स्वस्त मिळत असल्याने मोसंबीची मागणी कमी झाल्याने भावही घसरले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
रोपे लावल्यावर पाच वर्षाची प्रतीक्षा
60 रु. ची एक मोसंबी कलम नर्सरीत मिळते. 2 फूट बाय 2 फूट बाय 2 फूट चे खड्डे करून त्यात खत व गाळ भरून कलम पावसाळ्यात लावतात. दरवर्षी दोन वेळा शेणखत टाकतात. उन्हाळ्यात बरेच शेतकरी टँकरने विकतचे पाणी ठिबक संचाद्वारे झाडांना पुरवितात. एका हेक्टर क्षेत्रात सुमारे 277 मोसंबीची झाडे लावली जातात. सुमारे पाच वर्षानंतर फळबहार यावयसा सुरुवात होते. साधारण मृगबहार व आंबेबहार असे दोन बहार येतात. बहुतेक शेतकरी आंबेबहार घेतात. बाग लावल्यानंतर 15 ते 20 वर्षे त्यातून फळे घेता येतात.
अनुदानाच्या अडचणी
मागील वर्षाचे मोसंबी अनुदान शासनाने मंजूर केले मात्र ते अद्याप मिळालेले नाही. वाढत्या उन्हाच्या चटक्यावर विहिरींची पाणी पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. पाण्याअभावी मागील वर्षी 100 हेक्टर मोसंबी झाडांची तोड झाली होती. त्या जागी पुन्हा रोप लावण्यात आले. या कमी पाण्यात ते कसे जगवावे असा प्रश्न बळीराजा विचारत आहे. शेततळ्यांसाठी काही सधन शेतकरी तयार होतात मात्र खोदकाम व प्लास्टीक कागदावर निम्मेच अनुदान मिळत असल्याने इच्छा असून नाराजी व्यक्त करतात. कमी पाण्यात झाडे वाचविण्यासाठी अनुदानावर काही योजना होत्या त्या आज नसल्याने झाडे कशी वाचवावी या चिंतेत बळीराजा आहे.
उन्हाळ्यात पाण्यासाठी कसरत
परिसरात वाणेगाव, राजुरी, गहूते, साव्रे, पिंप्री, अटलगव्हाण, घोडसगाव, सातगाव, धाकडेगाव असे लघु पाटबंधारे आहेत. पावसाळा कमी जास्त होतो. तसेच उतावळी नदीवर मेणगाव - कोल्हे - पिंप्री अशी तीन पाटबंधारे असल्याने काही भरतात तर काही रिकामेच असतात. ठिबक संचाच वापर करून शेतकरी झाडे वाचवितात. तापीचे पाणी पिंपळगाव - पाचोरा परिसरात आणून ही धरणे भरल्यास हा भाग सुजलाम सुफलाम होईल असे जाणकारांचे मत आहे.