पारोळा, जि.जळगाव : आपण आपल्या जीवनात गेल्या $४२ वर्षांपासून जिल्हा बँकेच्या सहकार क्षेत्राच्या माध्यमातून संचालक आहोत. त्याला एकच कारण ते म्हणजे प्रामाणिकपणे आणि स्वाभिमानाने राजकारण केले म्हणून प्रदीर्घ काळापासून आपण राजकारणात टिकून आहोत, असे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी सत्काराच्या वेळी केले.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तालुक्यातील जिल्हा बँकेतील कर्मचारी व विविध कार्यकारी सोसायटीचे गटसचिव यांच्यावतीने नवनिर्वाचित शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा आर बी पाटील हे होते.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अमोल पाटील, उपसभापती मधुकर पाटील, नगरसेवक मंगेश तांबे, देखरेख संघ सचिव राजू परदेशी, सहायक निबंधक जी.एच.पाटील, जिल्हा बँक आधिकारी सुभाष गुमानराव पाटील, सहकार अधिकारी सुनील पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र पाटील, वसंत पाटील, शिरसमणी उपसरपंच चेतन पाटील उपस्थित होते.यावेळी सर्वांच्या वतीने चिमणराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. ते पुढे म्हणाले की, १९७८ पासून मी जिल्हा बँकेत संचालक आहे. माझ्या राजकारणाची सुरुवातच ही सहकार क्षेत्रापासून सुरू झाली. आजपर्यंत सहकार क्षेत्राच्या जोरावरच आपण राजकारणात विविध पदे उपभोगली. त्यामुळे सहकारातील प्रत्येक कर्मचारी हा माझा कुटुंबासारखा आहे, असे मी मानतो. तुमच्या सहकाराच्या चळवळीतून आमदार झालो. संचालक झालो. मंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. मंत्री होणं हे माझ्या हातात नाही. परंतु ते वरिष्ठांनी जबाबदारी दिली तर तुमच्या मदतीने नक्की यशवी करू, पण मंत्रिपदाची आपल्याला हौस नाही. मात्र गेल्या कित्येक वर्षापासून आपला परिसर विकासापासून वंचित आहे. त्यासाठी तालुक्याला मतदारसंघाला योग्य तो न्याय मिळावा. योग्य तो अधिक विकास व्हावा त्यासाठी तुमच्या माझ्या इच्छा आहेत, असे सांगितले. सूत्रसंचालन संजय अमृतकर यांनी, तर महाजन यांनी आभार मानले.
सहकार क्षेत्रात स्वाभिमानाने राजकारण केले -आमदार चिमणराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 7:16 PM