फैजपूर : शहरात चोरटे सक्रिय झाले आहेत. रविवारच्या मध्यरात्री धनाजी नाना महाविद्यालयासमोरील उपासना कॉलनीत दरवाजे, ग्रील तोडून धाडसी घरफोडी केली. त्यात चोरटय़ांनी सोने-चांदीचे दागिने व 20 हजार रुपये रोख असा एकूण 70 हजार रुपयांचा ऐवज लांबविला. या घटनेने परिसरातील रहिवासी भयभीत झाले आहेत. जवळच असलेल्या एका घराजवळून दुचाकीसुद्धा चोरीस गेली आहे.उपासना कॉलनीतील ज्योती नोमदास जावळे यांच्या घरी ही धाडसी घरफोडी झाली आहे. रविवारच्या मध्यरात्री चोरटय़ांनी घराच्या साईडला असलेल्या लोखंडी चॅनल गेटला लावलेले कुलूप आधी तोडून त्यानंतर लाकडी दरवाजाला होल पाडले आणि आतील कडी उघडली व घरात प्रवेश केला. घरातील 35 ग्रॅम सोन्याचे दागिने, 400 ग्रॅम चांदीची भांडी व 20 हजार रुपये रोख असा 69 हजारांचा ऐवज लंपास केला. चोरटय़ांनी घरातील कपाट शोधून काढले. त्यातील सामान व कपडे अस्ताव्यस्त फेकले. ज्या हॉलमध्ये जावळे कुटुंब झोपले होते, त्याच ठिकाणाहून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली.दरम्यान, याच घराजवळ राहणा:या एका विद्याथ्र्याची दुचाकीसुद्धा चोरीस गेल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांनी भेट दिली. ज्योती जावळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भादंवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास साठे व हेड कॉन्स्टेबल अरुण जाधव हे करीत आहेत. या घटनेमुळे शहरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. चोरटय़ांच्या हाताचे मिळाले ठसे घरफोडीची घटना सोमवारी पहाटे साडेपाच वाजता उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच, फौजदार रामलाल साठे, कॉन्स्टेबल किशोर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेत पंचनामा केला. घटनास्थळाला ठसे तज्ज्ञांनी भेट दिली. त्यांना काही ठिकाणी बोटांचे ठसे मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.
फैजपूर शहरात धाडसी घरफोडी
By admin | Published: March 28, 2017 12:09 AM