लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना बाधित होऊन उपचार घेऊन घरी परतल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी फोन करून आपल्याल कोरोना बाधित असल्याचा निरोप दिला, हा अतिशय गंभीर प्रकार असून प्रशासनात कुठलाच समन्वय नसून महापालिकेच्या या भोंगळ कारभाराबाबत कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ता योगेश देसेले यांनी केली आहे. त्यांनी याबाबत ट्वीट व मेलद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे तक्रारही केली आहे.
योगेश देसले यांनी १८ फेब्रुवारीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तपासणी केली होती. त्यांना या ठिकाणी बारा तासाच्या आता बाधित म्हणून अहवाल मिळाला. यानंतर ते खासगी रुग्णालयात दाखल झाले. मात्र, उपचार घेऊन परतल्यानंतर मंगळवारी सकाळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा त्यांना फोन आला. त्यात तुम्ही बाधित असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले, यावर आपण पंधरा दिवसांपूर्वीच बाधित होतो, असे देसले यांनी सांगितले. यावर आम्हाला वरिष्ठांनी याद्या आज दिल्याचे संबधित कर्मचारी महिलेने सांगितले. या प्रकारावर देसले यांनी संताप व्यक्त केला. प्रशासन लोकांना नियम पाळण्याचे आवाहन करते, मात्र, पंधरा पंधरा दिवस एखाद्या व्यक्तीचे अहवाल समोर येत नाही, अशा स्थितीत सामान्यांनी काय करायचे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मनपा प्रशासनावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.