जळगाव : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (पाचवी) व पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती (आठवी) परीक्षा २३ मे रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता, ही परीक्षा तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. त्यामुळे यंदा पाचवी-आठवी शिष्यवृत्ती परीक्षा होणार की नाही हा संभ्रम निर्माण झाला होता. नंतर शिक्षण विभागाने पत्र काढत, शिष्यवृत्ती परीक्षा ही २५ एप्रिलला होणार असल्याबाबत स्पष्ट केले व २१ मार्चपर्यंत आवेदनपत्र भरण्यास मुदत देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरसुद्धा परीक्षेच्या वेळापत्रकात शासनाकडून बदल करण्यात आला होता व परीक्षा २३ मे रोजी घेण्याचे निश्चित केले होते.
कोरोनाचा कहर, परीक्षा स्थगित...
आधीच परीक्षेला पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला होता. १० एप्रिलपर्यंत शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली होती. तसेच आता राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, परीक्षा घेणे शक्य नसल्यामुळे पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा ही तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.