जळगाव : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, यांच्याकडून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) येत्या २५ एप्रिल रोजी होऊ घातली आहे. या परीक्षेकरिता आवेदनपत्र भरण्याकरिता ९ मार्च ते २१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व आठवीकरिता मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क शासनाकडून भरले जातात. त्यामध्ये एसटी, व्हीजे एनटी या संवर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश होतो. मात्र, एसबीसी, ओबीसी आणि खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून भरण्याचा निर्णय २०१७ मध्ये घेण्यात आला आहे. त्याकरिता ३ लाखांची तरतूद करण्यात आली असून यातून केवळ परीक्षा शुल्क व शाळा संलग्नता शुल्क भरता येणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती परीक्षेत सहभागी व्हावे. याकरिता २१ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
दीडशे गुणांची परीक्षा
पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा ही दीडशे गुणांची होईल. प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा, बृद्धिमत्ता चाचणी या विषयांवर ही परीक्षा असेल. २५ एप्रिलला सकाळी ११ वाजता परीक्षा प्रारंभ होणार आहे. दरम्यान, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.