जळगाव : भोसरी येथील भूखंड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून शनिवारी आपल्याला नोटीस प्राप्त झाली आहे. ३० डिसेंबरला ईडी कार्यालयात बोलाविण्यात आले असून, चौकशीत आपण सर्व सहकार्य करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी माध्यमांना दिली. या प्रकरणात ही पाचवी चौकशी असल्याचे त्यांनी सांगितले.
भोसरी येथील भूखंड हा पत्नी मंदाकिनी खडसे यांनी खरेदी केला असून, एकत्रित कुटुंब म्हणून कदाचित माझ्या नावाने ही नोटीस आली असेल, असेही खडसे म्हणाले. या आधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दोन वेळा, आयकर विभागाकडून एक वेळा आणि झोटींग समिती एक वेळा अशा चार वेळा चौकशा झालेल्या आहेत. यात लाचलुचपत विभागाने एका चौकशीचा क्लोजर अहवाल दिला आहे. या चारवेळाही चौकशी दरम्यान, जी काही कागदपत्रे मागितली, ती सर्व देऊन मी सहकार्य केले आहे. आता ईडीलाही ते जे काही कागदपत्र मागतील ते सर्व कागदपत्र देऊन आपण सहकार्य करणार असून, ३० रोजी मी स्वत: असेल किंवा प्रतिनिधी या चौकशीला उपस्थित राहणार असल्याची माहिती खडसे यांनी यावेळी दिली. याबाबत कुठलेही राजकीय वक्तव्य करण्यास त्यांनी नकार दिला.