महानिरीक्षकांची तपासणी सुरु
जळगाव : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांचे पथक जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांच्याकडून जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी सुरु झालेली आहे. येत्या दोन दिवसात दिघावकर जिल्ह्यात येणार आहेत. ते अमळनेर, जळगाव एमआयडीसी व सावदा पोलीस ठाण्याला भेट देऊन दप्तर तपासणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या दप्तर तपासणीमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना घाम फुटला आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे रुप पालटले
जळगाव : एमआयडीसी पोलीस ठाण्यात निरीक्षक प्रताप शिकारे यांनी पदभार घेतल्यानंतर लागलीच पोलीस ठाण्याच्या नूतनीकरणाला भर दिला आहे. ठाणे आवारातील वृक्षांची छाटणी करण्यात आली असून फलकही नव्याने लावण्यात आले आहेत. त्याशिवाय काही खोल्यांचे नूतनीकरण केले जात आहे. यामुळे पोलीस ठाण्याचे रुपच पालटले आहे. दरम्यान, या पोलीस ठाण्याला महानिरीक्षकही भेट देणार असल्याचे प्रलंबित गुन्ह्याचा निपटारा केला जात आहे.
अनोळखी वृध्दाचा मृतदेह आढळला
जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती आवार परिसरात ५० ते ५५ वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता हा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ओळख पटविण्याचे आवाहन तपासाधिकारी रामकृष्ण पाटील यांनी केले आहे.