जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या शंभर टक्के उपस्थितीचा निर्णय मागे घेऊन पन्नास टक्के उपस्थितीचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी शिक्षक सहकार संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनाने पुन्हा जिल्ह्यात थैमान घातले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी १६ मार्चपासून जिल्ह्यातील सर्वच माध्यमांच्या शाळा बंद करण्याचे परिपत्रक काढले आहे. परंतु, शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्यास सांगितले आहे. राज्यात शिक्षकांची पन्नास टक्के उपस्थिती व शाळेची वेळ सकाळी ७.३० ते १२ वाजेपर्यंत असताना जळगाव जिल्ह्यात शाळेची वेळ दुपारी १ वाजेपर्यंत असून शंभर टक्के उपस्थिती सांगण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता व कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता सकाळी ७.३० ते ११.३० वाजेपर्यंत शाळेची वेळ करण्यात व शिक्षकांच्या पन्नास टक्के उपस्थितीचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर संघटनेचे विभागीय सरचिटणीस जितेंद्र गवळी यांची स्वाक्षरी आहे.