जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवडीवरुन महाविकास आघाडीतच राडा झाला. लक्ष्मण गंगाराम पाटील व श्यामकांत बळीराम सोनवणे दोघांनी या पदावर दावा करत अर्ज दाखल केले. नाट्यमय घडामोडीनंतर अखेरच्या क्षणाला श्यामकांत सोनवणे यांच्या गळ्यात ही माळ पडली. सोनवणे यांना १८ पैकी १५ मते मिळाली. विशेष म्हणजे भाजप व शिंदे गटाच्या संचालकांनीही सोनवणेंना मतदान केले. उपसभापती प्रा.पांडूरंग बाबुराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ११ जागा विजयी झालेल्या आहेत. अपक्ष असलेल्या पल्लवी देशमुख या महाविकास आघाडीच्या बाजुने आहेत. महाविकास आघाडी फोडण्याचा प्रयत्न भाजप व शिंदे गटाकडून झाला, त्यात त्यांना अपयश आले. मात्र विरोधकांपेक्षा महाविकास आघाडीतच सभापती पदावरुन वाद निर्माण झाले. कुटूंबातील दोन संचालक तसेच निवडणुकीतील अर्थकारण पाहता लक्ष्मण पाटील यांनी सभापतीपदासाठी दावा केला होता. त्यांच्या नावाला पसंतीही देण्यात आली होती. त्याचवेळी श्यामकांत सोनवणे यांनी देखील या पदावर दावा केला.
सोनवणे व पाटील शेवटपर्यंत आपआपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने वादाला तोंड फुटले. दोघांनी या पदासाठी अर्ज दाखल केला. हात उंचावून मतदान घेण्यात आले. सोनवणे यांना लक्ष्मण पाटील, त्यांचा मुलगा संदीप पाटील व हेमलता नारखेडे वगळता उर्वरित सर्व १५ संचालकांनी मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी के.डी. पाटील यांनी श्यामकांत सोनवणे यांची निवड झाल्याचे घोषीत केले. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचे स्वागत केले.