कोरोनाचे संकट काहीसे निवळत असताना आता म्युकरमायकोसिस अर्थात काळ्या बुरशीच्या आजाराचा धोका वाढू लागला आहे. मार्च महिन्यात जळगावात याची परिस्थिती मांडली गेली होती. मात्र, याची तीव्रता आता राज्यभर पसरत आहे. शासनानेही दखल घेऊन या महागड्या उपचाराच्या आजाराचा समावेश महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेत केला आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहेत. त्यातच आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी याचे गांभिर्य ओळखून तातडीने टास्क फोर्स नियुक्त करून उपचाराच्या बाबतीत नियोजन सुरू केले आहे. त्यामुळे हा एक मोठा दिलासा शासकीय पातळीवर या रुग्णांना मिळणार आहे. कोविड सेाबतच या आजाराशी लढायला प्रशासनाला अधिक सतर्क व्हावे, लागणार असल्याचे एकंदरीत चित्र निर्माण झाले आहे. नेत्ररोगतज्ञ तथा आयएमएचे माजी सचिव डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी या आजाराच्या गांभिर्याविषयी जळगावातून सर्व प्रथम वाचा फोडली होती. मार्च महिन्यात त्यांनी या दुर्मिळ आजाराची तीव्रता व तो कसा झपाट्याने वाढतोय याबाबत भाष्य केले होते. शिवाय त्यांनी इथवर न थांबता याचे गांभिर्य व उपाययोजनाबाबत प्रशासकीय पातळीवरही पाठपुरावा केला होता. अखेर राज्यभर या आजाराचे तीव्र स्वरूप समोर आले व शासकीय पातळीवर अखेर उपाययोजना सुरूवात करण्यात आली.
म्यूकरमायकोसिस अगदी कमी वयाच्या रुग्णांनाही झाल्याचे समोर आल्याचे डॉक्टरांचे मत आहे. हा आजार नवा आहे असे नाही, मात्र, तो अत्यंत दुर्मिळ होता. मात्र, आता त्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शासकीय यंत्रणेत १३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील ११ रुग्ण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आहेत. स्टेराईडचा गरजेपेक्षा अतिवापर, अनियंत्रीत मधुमेह, प्रतिकाक्षमता कमी असणे, अशी काही याची कारणे असल्याचे डॉक्टर सांगतात. सुरूवातीला कमी वाटणारा हा काळ्या बुरशीचा आजार नंतर तीव्र रुप घेतो असेही तज्ञ सांगतात. शासकीय नोंद १३ असली तर जिल्ह्यात याचे शंभरावर रुग्ण असल्याचे खासगी यंत्रणेकडून समजते. त्यामुळे कोरोनासोबतच आता या नवीन आजाराशी लढा द्यावा लागणार असून प्रशासकीय यंत्रणेकडून टाकण्यात आलेले पाऊल स्वागतार्ह आहे....