याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या तक्रारीत म्हटले आहे की, दिनांक १० जुलै रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास थोरगव्हाण शिवजवळ रामेश्वर किशोर पाटील यास समाधान मंगल सोनवणे, नीलेश समाधान सोनवणे, योगेश लहू सोनवणे व सुनील रामकृष्ण सोनवणे, सर्व रा. थोरगव्हाण यांनी म्हटले की, तुम्ही रस्त्यात का मोटारसायकल उभी केली आहे, आमचे वाळूचे ट्रॅक्टर येत आहे, असे म्हणत शिवीगाळ करून समाधान सोनवणे याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने रामेश्वर यांच्या सोबत असलेल्या दिनेश अशोक पाटील यांच्या डोक्यावर आणि छातीवर मारहाण करून दुखापत केली, तसेच योगेश सोनवणे व सुनील सोनवणे यांनी प्रवीण भागवत पाटील यांना लाकडी काठीने हातावर आणि पाठीवर मारहाण करून दुखापत केली. याचबरोबर वाळूने भरलेले ट्रॅक्टर त्याच ठिकाणी खाली करून ते निघून गले. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या गटाकडून समाधान मंगल सोनवणे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे की, दिनांक १० जुलै रोजी रात्री ७:४५ वाजेच्या सुमारास मी थोरगव्हाण गावावळ मोटारसायकलने शेतातून घरी येत असताना ज्ञानेश्वर पाटील, रामेश्वर पाटील, गणेश पाटील, प्रवीण पाटील, सर्व रा. थोरगव्हाण यांनी माझी मोटारसायकल अडवून वाद घालून शिवीगाळ करून प्रवीण पाटील व रामेश्वर पाटील याने लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करून मला जिवे मारण्याची धमकी दिली. तपास पोहेकॉ. गोरख पाटील करीत आहे.