लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानादरम्यान तालुक्यातील आव्हाणे व आसोदा येथे चांगलाच गोंधळ झाला. यामुळे काही काळ मतदानप्रक्रिया थांबवण्यात आली होती.
आव्हाणे येथे दोन गटांत मतदानादरम्यान तीनवेळा हाणामारीच्या घटना घडल्या, तर आसोदा व शिरसोली प्र.न. येथेदेखील मतदान केंद्रावर प्रमाणात गर्दी वाढल्याने मोठा गोंधळ झाला. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आसोद्यात पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्याउलट गाढोदा, फुपनगरी, वडनगरी या गावांमध्ये शांततेत मतदान पार पडले.
आसोद्यात मतदानयंत्रात बिघाड; मतदान एक तास बंद
आसोदा येथे सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदारांना घरून थेट केंद्रावर आणले जात असल्याने केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत गेली. यामुळे काही उमेदवारांमध्ये शाब्दिक चकमकदेखील झाली. त्यातच प्रभाग क्रमांक ५ मधील मतदानयंत्रात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तब्बल १ तास मतदानप्रक्रिया बंद होती. दुपारी २ वाजेच्या सुमारास मतदान केंद्र व बाहेर गर्दी वाढल्याने गोंधळ वाढला. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. आसोद्यात लोकमान्य, असोदा विकास पॅनल व संभाजी आबा ग्रामविकास पॅनल अशी तिरंगी लढत आहे.
आव्हाण्यात हाणामारी आणि वाद
आव्हाणे येथील ९ जागांसाठी मतदानप्रक्रिया पार पडली. गावात एकूण ८५ टक्के मतदान झाले. आव्हाणे विकास व ग्रामविकास पॅनलमध्ये चुरस असून, मतदानाच्या दिवशीदेखील ही चुरस पाहायला मिळाली. दुपारी १ वाजता केंद्रात मतदारांना घेऊन जाण्यावरून दोन गटांत हाणामारी झाली. यामुळे मतदान केंद्र व परिसरात तणाव निर्माण झाला होता. पुन्हा दुपारी २ वाजता दुसऱ्या प्रभागातील उमेदवारांच्या नातेवाइकांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यामुळे काहीकाळ मतदान थांबविण्यात आले होते. तसेच पोलिसांनाही अतिरिक्त बंदोबस्त मागवावा लागला. मतदान केंद्र परिसरात येणाऱ्या काही टवाळखोर तरुणांवर लाठीमारदेखील केला. दुपारी ४ नंतर मतदान केंद्रावर शुकशुकाट पाहायला मिळाला.
गाढोद्यात शांतता; ८० टक्के मतदान
गाढोदा येथे मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळपासूनच केंद्रांवर रांगा होत्या. दुपारी ३ वाजेपर्यंत ७० टक्के मतदान झाले. दुपारी ४ नंतर मतदान केंद्रावर शुकशुकाटच पाहायला मिळाला. गाढोद्यात रामचंद्र सीताराम पाटील व गोपाळ फकीरचंद पाटील यांच्या पॅनलमध्येच पारंपरिक लढत आहे. दोन्हीही नेते शिवसेनेचे असल्याने ही लढत शिवसेना विरुध्द शिवसेना अशीच आहे.
फुपनगरीत ९५ टक्के मतदान
फुपनगरीतदेखील शांततेत मतदान झाले. फुपनगरीत जितेंद्र अत्रे यांच्या युवाशक्ती ग्रामविकास व राहुल जाधव, गणेश जाधव यांच्या परिवर्तन विकास पॅनलमध्ये तगडी टक्कर आहे. फुपनगरीत एकूण ९५ टक्के मतदान झाले असून, मतदानाबाबत मतदारांमध्ये संभ्रम दिसून आला. तिन्ही उमेदवारांना मतदान केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होते. मात्र, मतदार एका उमेदवाराला मतदान केल्यानंतर बीप वाजण्याची वाट पाहत होते. यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाही चांगलाच मनस्ताप झाला. तसेच मतदान प्रक्रियादेखील अतिशय संथ गतीने झाली.
शिरसोलीत मतदान केंद्रामध्ये थांबण्यावरून वाद
शिरसोली प्र.न. येथे जि.प.च्या मराठी शाळेत मतदान झाले. सकाळपासून मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. वाॅर्ड क्रमांक २ मधील मतदारांना बूथमध्ये नेण्यावरून दोन उमेदवारांमध्ये वाद झाला. काहीजणांनी हस्तक्षेप करीत हा वाद सोडविला. मतदान केंद्राबाहेर गर्दी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर क्यूआरटी पथकाच्या क र्मचाऱ्यांनी जमावाला पांगविले. यावेळी काहीसा गोंधळ निर्माण झाला होता.
शिरसोली येथे अपर पोलीस अधीक्षकांची भेट
शिरसोली प्र.न. व शिरसोली प्र.बो. या दोन्ही मतदान केंद्रांवर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी भेट दिली. यावेळी मतदान केंद्रांवर गर्दी वाढल्याने त्यांनी जमाव हटविण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. यावेळी काही काळ पळापळ झाली.