जळगाव : मास्टर कॉलनीतील महानगरपालिकेच्या शाळेजवळ भरलेल्या बाजारातील गर्दीचे वृत्तांकन करणाऱ्या महिला पत्रकार नाजनीन शेख रईस शेख (२९, भारत नगर) यांना दहा ते बारा जणांनी घेराव घालून हुज्जत घातली. रविवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मास्टर काॅलनीत रविवारी सायंकाळी बाजार भरवण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग पसरू नये म्हणून बाजारास शासनाने बंदी घातलेली आहे. नाजनीन शेख या बाजारात वृत्तांकन करण्यासाठी गेल्या असता, मोबाईलमध्ये बाजाराचे चित्रीकरण करताना काही जणांनी त्यांना घेरले व चित्रीकरण करण्यास मनाई केली. त्यापैकी एका जणाने यांचा मोबाईल हिसकावला व त्यांना घराच्या कंपाऊंडमध्ये नेले. केलेले चित्रीकरण डिलीट करीत नाही, तोपर्यंत आम्ही तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. याप्रकरणी दहा जणांविरूद्ध कलम १८८, २६९ व साथरोग नियंत्रण कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कोळी करीत आहेत.