जळगाव : कमी पगाराच्या नोकरीपासून सुरुवात झाली. गरिबीशी लढता लढता रोजचा संघर्ष थांबत नव्हता. एका फोटो स्टुडिओत काम मिळालं अन् तेथे हळूहळू फोटो कसे काढायचे हे शिकत गेले. तीही नोकरी सोडली अन् स्वत:चा स्टुडिओ टाकला. पण परिस्थिती पाठ सोडत नव्हती अन् तेही पुढे जायचं थांबत नव्हते. अखेर जम बसला अन् फोटोग्राफीत रुळलो. आज त्यांचे जळगावात सहा स्टुडिओ आहेत. तीन पिढ्या, रोजचा संघर्ष अन् रोज फोटोग्राफीत नव्याने होणारे बदल या सर्व बाबींना एक नव्हे ती तिन्ही पिढ्यांनी स्वीकारले, काळासोबत चालले.शून्यातून घडलेल्या एका जुन्या फोटोग्राफरच्या कुटुंबाची ही कहाणी... नाव सुधाकर रामचंद्र जगताप. आज त्यांची तिसरी पिढीही फोटोग्राफी करून जगतेय अन् यशस्वीपणे हा उद्योग संभाळत आहे.जळगावातील मिलमध्ये असलेली नोकरी ही मजुरासारखी! त्या उत्पन्नातून काहीच भागत नसल्याने जगताप यांनी नोकरीला रामराम केला अन् नाना पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली ते एका स्टुडिओत काम करत असताना फोटोग्राफी शिकले अन् काही दिवसांनी, १९७०मध्ये त्यांनी सतीश फोटो स्टुडिओ नावाने स्टुडिओ सुरु केला. छोटा कॅमेरा घेऊन ते फोटो काढायचे.पहाटे ६ वाजता त्यांचा हा व्यवसाय सुरु व्हायचा तो मध्यरात्री १.३० वाजता संपायचा. त्यावेळी दोन चार महिने अगोदर फोटोग्राफीसाठी तारीख निश्चित केली जायची. या स्टुडिओमुळे आर्थिक व्यवस्था सुधारत गेली. त्यानंतर मार्तंड फोटो स्टुडिओ सुरु केला, नवी पेठेत १९७८ साली.त्यानंतर सतीश जगताप यांनी १४व्या वर्षापासून फोटोग्राफीचे काम करायला सुरुवात केली. १९८४-८५मध्ये रंगीत फोटोग्राफीला मागणी वाढली अन् व्यवसाय आणखी चांगला सुरु झाला. त्याचे पैसेही चांगले मिळायचे. ते फोटो धुण्यासाठी मुंबईत पाठवावे लागत.सहा महिन्यांनी ते मिळायचे. त्यानंतर व्हिडिओ शुटींग आले. प्रेस फोटोग्राफर म्हणून काम करायची संधी मिळाली. त्यामुळे व्यवसायात आणखीनच बहर आली.शुभम् जगताप, आज जगताप कुटुंबातील तिसरी पिढी या व्यवसायात उतरली आहे. फोटोग्राफीतील बदल, आव्हाने सर्व काही स्वीकारून सहा स्टुडिओचा भार संभाळत शुभम्ही या व्यवसायात उतरला आहे.राजीव गांधींची जळगाव भेट अन् आठ दिवसातच हत्या..माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी हत्या झाली होती. त्याच्या आठ दिवस अगोदर ते जळगावात कॉंग्रेसच्या एका कार्यक्रमासाठी आले होते. ते छायाचित्र टिपण्याचा मान सतीश जगताप यांना मिळाला होता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या माजी राष्टपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडे आल्या होत्या, त्यांचे छायाचित्र सुधाकर जगताप यांनी टिपले होते.- जुन्या काळात फोटो काढल्यानंतर तो एका विशिष्ट पाण्यात धुवावा लागे. ते पाणी घेण्याचीही ऐपत नसायची. त्यावेळी अन्य मोठ्या फोटोग्राफरकडून आम्ही ते करवून घ्यायचो. पण सेवेत खंड पडू दिला नाही, असे सतीश जगताप सांगतात.सुरुवातीपासून एक तत्व आम्ही जपलं. पैसे किती मिळतील, हे न पाहता आम्ही काही फोटोसाठीही इंदौर, विशाखापट्टणम गाठले. पण आॅर्डर कोणतीही सोडली नाही. त्यामुळे जास्त करून आमचा व्यवसाय बहरत गेला.-सतीश जगताप, छायाचित्रकार
गरिबीशी लढले, नाते फोटोग्राफीशी जुळले..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 12:10 PM