लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देखील नागरिकांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. तसेच लक्षणे असलेले नागरिक कोरोनाची चाचणी केल्यानंतर अहवालाची वाट न पाहता बाहेर निर्धास्तपणे फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. आरटीपीसीआर ची तपासणी केल्यानंतर अहवाल येईपर्यंत घरात न थांबणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापौर भारती सोनवणे यांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत.
चाचणी केल्यानंतर अनेक नागरिक अहवालाची प्रतीक्षा न करताच निर्धास्तपणे बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी मनपा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. याबाबत महापौर भारती सोनवणे यांच्याकडे देखील वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. तसेच शहरात वाढत असलेल्या रुग्ण संख्येला काही नागरिकांचे दुर्लक्ष कारणीभूत ठरत असल्याने त्यावर कडक उपाय योजना करण्याचा निर्णय आता महापालिकेने घेतला आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागासह इतर विभागातील कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले असून हे पथक शहरातील विविध भागात फिरणार आहे. तसेच ज्या नागरिकांनी कोरोना चाचणी केली आहे अशा नागरिकांच्या घरी देखील या पथकातील कर्मचारी भेट देणार आहेत. चाचणी केल्यानंतर संबंधित नागरिक घरी आढळली नाही तर त्या नागरिकांवर मनपाकडून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली आहे. यासह अफवा पसरवणाऱ्यावर देखील मनपाकडून गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. कोविल केअर सेंटर मध्ये देखील रुग्णांकडून किंवा रुग्णांच्या नातेवाइकांकडून प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे आढळले तरीही संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत.