जळगाव : येथील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील कथित अपहाराच्या प्रकरणात पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. त्यात अजय ललवाणी (रा. नाचणखेडा), अजय राठी, उदय कांकरिया, धरम सांखला, विवेक ठाकरे, प्रकाश वाणी आणि सुनील झंवर यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोहगाव, पुणे येथील रहिवासी संतोष काशिनाथ कांबळे (वय ५७) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार कांबळे यांचे वडील निवृत्त शिक्षक काशिनाथ भागवत कांबळे यांनी सेवानिवृत्तीनंतर मिळालेली रक्कम २०१४ मध्ये कोरेगाव भीमा येथील बीएचआरच्या शाखेत गुंतवली होती. त्यात काशिनाथ कांबळे यांच्या पत्नी मंदाकिनी यांच्याही नावावर काही रक्कम मुदतठेव म्हणून ठेवण्यात आली होती. याची मुदत संपल्यावर ही पतसंस्थेकडून १८ लाख ७ हजार १५९ रुपये येणे होते. मात्र २०१५ मध्ये दिवाळीनंतर शाखेत गेल्यावर संतोष कांबळे यांना शाखा बंद असल्याचे दिसले. ते शिक्रापूर येथील पतसंस्थेच्या शाखेत गेले असता ती शाखादेखील बंदच होती. त्यानंतर कांबळे हे १५ दिवसांनी जळगाव एमआयडीसीतील पतसंस्थेच्या मुख्य शाखेत आले. तेथे जितेंद्र कंडारे यांना भेटल्यावर पतसंस्थेवर आता कंडारे हे अवसायक असल्याचे समजले. त्यानंतर कंडारे यांनी तुम्हाला १५ - २० टक्केच रक्कम मिळू शकत असल्याची माहिती दिली. त्यानंतर ठेवी आणि पत्ता यांची माहिती घेतली. त्यात लोहगावला माणसे घरी येतील. त्यांना हव्या तेथे सह्या द्या, असे सांगितले. उरलेल्या रकमेची विचारणा केल्यावर कांबळे यांना माणसांकडून धक्काबुक्की करून बाहेर काढण्यात आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
जून २०१९ मध्ये कांबळे यांच्या घरी लोहगावला दोन माणसे आली. त्यांनी ३० टक्के रक्कम देण्याचे कबूल केले. मात्र ७० टक्के रक्कम मिळणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर शपथपत्राचे काही नमुने देऊन कंडारे यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले. त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये कांबळे पुन्हा जळगावला आले. त्यांनी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात जाऊन चौकशी केली असता ठेवींच्या पावत्यांच्या खरेदी-विक्रीबाबत कळले, असेही कांबळे यांच्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, कांबळे यांच्या वडिलांचे निधन झाले. तसेच लॉकडाऊनच्या काळात त्यांची नोकरीदेखील गेली आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे.
पावत्यांची विक्री करा, नाहीतर पैसे विसरा
जितेंद्र कांबळे हे जळगावला नोव्हेंबर २०१७ मध्ये आले होते. त्या वेळी अवसायक कंडारे याला भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या वेळी त्यांना सांगण्यात आले की, पावत्या २० टक्के रक्कम घेऊन विका अन्यथा सगळेच पैसे विसरा. मला पूर्ण पैसे पाहिजे, असे सांगितल्यावर पतसंस्थेतील माणसांनी त्यांना हाताला धरून बाहेर काढले.
कांबळे यांना दमदाटी
कांबळे यांना पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात दमदाटी करण्यात आली होती. तसेच त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने त्यांना कायमच जितेंद्र कंडारे आणि त्याच्या माणसांकडून दमदाटी करण्यात येत होती. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत पोलिसात तक्रार दिली नव्हती.