आॅनलाईन लोकमत,
जळगाव, दि.२९- एस.टी.बस व रिक्षा यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन त्यात लक्ष्मण कैलास सोनवणे (वय २७,रा.बांभोरी, ता.धरणगाव) हा रिक्षा चालक गंभीर झाला तर दुसरा कैलास भागवत नन्नवरे (वय ३७,रा.बांभोरी, ता.धरणगाव) हा तरुण किरकोळ जखमी झाला. हा अपघात मंगळवारी सायंकाळी साडे पाच वाजता महामार्गावर बांभोरी बस गावाजवळ झाला.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, लक्ष्मण सोनवणे व कैलास नन्नवरे हे दोन्ही जण रिक्षाने (क्र.एम.एच.१९ व्ही.५४७४) पाळधी येथून बांभोरी येथे येत होते तर शिरपुर आगाराची जळगाव-शिरपुर ही एस.टी.बस (क्र.एम.एच.२० बी.एल.०६९९) पाळधीकडे जात असताना महामार्गावर बांभोरी येथे विद्यापीठाकडे जाणाºया रस्त्याजवळ रिक्षावर धडकली.त्यात रिक्षातील दोघं जण जखमी झाले.
रिक्षात अडकला चालकहा अपघात इतका भयानक होता की बसच्या धडकेने रिक्षाचा दर्शनीभाग अक्षरश: चक्काचूर झाला तर त्यात चालक लक्ष्मण हा अडकला होता. गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. कैलास हा मागे बसल्यामुळे त्याला लागलीच काढणे शक्य झाले तर लक्ष्मण हा रिक्षाच्या टपात व स्टेअरींगमध्ये अडकल्याने त्याला बाहेर काढायला कसरत करावी लागली. दोन्ही जखमींना तातडीने दुसºया रिक्षातून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. पाळधी दूरक्षेत्राचे सहायक निरीक्षक विजय देशमुख व सहकाºयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले.
बस चालकाने काढला पळअपघाताची भीषणता व घटनास्थळावर रक्ताचा सडा पाहून बस चालकाने तेथून बससह पळ काढला, तो थेट पाळधी पोलिसात हजर झाला. चालक प्रेमसिंग पुना गिरासे (रा.दहिवद, ता.शिरपुर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बस चालक घटनास्थळावरुन पळाला नसता तर गावकºयांनी त्याला झोडपून काढले असते अशी स्थिती होती. जिल्हा रुग्णालयातही नागरिक संतप्त झाले होते. चालकाला हलविले खासगीजखमी लक्ष्मणची स्थिती पाहता त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. कैलास याला सुरुवातीलाच खासगी दवाखान्यात नेण्यात आले. यावेळी नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाली होती. लक्ष्मणच्या आईचा प्रचंड आक्रोश सुरु होता. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.