जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. रविवारी खोटेनगर ते दादावाडी या दरम्यान अंडरपासच्या कामासाठी आरई वॉल आणि भराव टाकण्याचे काम सुरू झाले.
गेल्या काही दिवसांपासून या मार्गाच्या चौपदरीकरणाला वेग आला आहे. शनिवारी प्रभात चौकात असलेल्या भुयारी मार्गाच्या स्लॅबचे काम करण्यात आले होते. प्रभात चौकातील भुयारी मार्ग पुढच्या दीड महिन्यात सुरू होऊ शकतो.
त्यानंतर रविवारी सकाळपासून दादावाडी भुयारी मार्गासाठी आणि त्याच्या पुढच्या कामासाठी भराव टाकण्याचे काम सुरू होते. त्यासोबतच पुढचे काही दिवस आरई वॉल उभारण्याचे कामदेखील या भागात केले जाणार आहे.
महामार्गाच्या मधोमध भुयारी मार्गासाठी मोठी चारी खोदण्यात आली आहे. त्यात आता भराव टाकून त्या भुयारी मार्गाचा स्लोप वेगळा काढला जाईल. हे काम पूर्ण होण्यास अजून बराच कालावधी लागणार असल्याची माहिती ठेकेदार कंपनीच्या व्यवस्थापकांकडून मिळाली.
शहरातून जाणाऱ्या महामार्गावर सध्या तीन ठिकाणी अंडरपास उभारणीचे काम सुरू आहे. त्यात दादावाडी, गुजराल पेट्रोल पंप, प्रभात चौक येथे काम सुरू आहे. तर शिव कॉलनी आणि अग्रवाल चौकात आणखी दोन भुयारी मार्ग होणार आहे. त्यात शिव कॉलनीतील भुयारी मार्ग हा चेंज ऑफ स्कोपमध्ये केला जाणार असून अग्रवाल चौकातही एक छोटा भुयारी मार्ग होणार आहे.
सध्याचे हे भुयारी मार्ग पूर्ण झाले की अग्रवाल चौकातील कामांना सुरुवात होणार आहे. तर शिव कॉलनीतील भुयारी मार्गाच्या कामाची अद्याप मंजुरी आलेली नाही.