जळगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमी शहरात कडक निर्बंध असतांनाही मेहरुण तलावावर गाण्याचे चित्रीकरण करणे तरुणांना चांगलेच भोवले आहे. पोलिसांनी सोमवारी दुपारी चित्रीकरण थांबून कॅमेरे वाहने जप्त केली. त्याशिवाय दहा जणांवर गुन्हा दाखल केला.
शहरातील मेहरुण तलाव परिसरात काही तरुण एकत्र जमून चित्रीकरण करत असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी मिळाली. त्यानुसार चिंथा यांनी थेट मेहरुण तलाव गाठून एमआयडीसी पोलिसांना पाचारण केले. याठिकाणी चित्रीकरण करणाऱ्या वृषाल नितीन राठोड (वय २० रा. सुप्रिम कॉलनी), मनोज भिका जाधव (वय २० रा.वराड ता. जळगाव), सुरज रंजे सोनार (वय १९ रा. रामेश्वर कॉलनी), अभिजित रमेश चव्हाण (वय २५ रा. सुप्रिम कॉलनी), आनंद उर्फ गणेश सोमनाथ भोई वय (२१ रा. जुने गाव), सचिन चंद्रकांत भिरुड (वय २३ रा. पिंप्राळा जळगाव), गोपाल जगदीश राठोड (वय १९), ईश्वर रोहिदास राठोड (वय २२ दोन्ही रा. वराड ता.जळगाव), रिना यशवंत जाधव (वय २०, रा. शिवकॉलनी), अंकिता शरद बोदडे (वय २० रा. जामनेर) यांना ताब्यात घेत कारवाई केली. कारवाईत एक लाखांचा कॅमेरा तसेच दहा दुचाकी असा ४ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नामदेव पाटील यांच्या फिर्यादीवरुन तरुण अशा दहा जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.