लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : वयाच्या २१व्या वर्षी इंग्रजांचे कार्यालय नासधूस करून इंग्रजांच्या राणीचा टांगा जाळणाऱ्या व भारताच्या स्वातंत्र्यासाठी अंगावर ब्रिटिशांच्या गोळ्या झेलणारा १०२ वर्षांचा स्वातंत्र्य सैनिक जंगलू सावळाराम सुतार यांनी ३१ मार्च रोजी जगाचा निरोप घेतला. शासनातर्फे शासकीय मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
जंगलू सावळाराम सुतार (शिवशक्ती चौक, बाहेरपुरा) यांनी १९४२ला अमळनेर येथील पाचकांदिल चौकात साठे बिल्डिंग मधील इंग्रजांच्या कार्यालयाची नासधूस करून इंग्रजांच्या राणीचा टांगा जाळला. महात्मा गांधी नागपूरवरून अमळनेरला येत असताना त्यांनी अमळनेर पोलीस स्टेशनवर ‘वंदे मातरम’च्या घोषणा देत स्वागत केले. त्यावेळी इंग्रजी सैनिकांनी लाठीचार्ज करत त्यांना जखमी केले होते तर भारत छोडो आंदोलनात सहभाग घेतला असता त्यांच्यावर इंग्रजांच्या गोळीबारीत हाताच्या दंडावर व पायावर गोळी लागली होती. इंग्रजांच्या कायद्यान्वये त्यांना २० वर्षाची शिक्षा झाली होती.
त्यांना आधी जळगाव कारागृहात ठेवण्यात आले होते. नंतर विसापूर व येरवाडा तुरुंगात ते मनोरंजक कैदी म्हणून चर्चेत होते. त्यांना कारागृहात पातळ भाजी आणि ज्वारीच्या जळालेल्या भाकरी देण्यात येत असल्याने त्यांनी जेलरच्या अंगावरही भाजी फेकण्याचे धाडस केले होते. १९४७ च्या स्वातंत्र्यानंतर त्यांची कारागृहातून सुटका झाली होती. वयाचे शतक पार करून त्यांनी १०२व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.
स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्याला मिळणाऱ्या सुविधांपासून सुतार कुटुंब लांबच राहिले. आपल्या एकुलत्या एक मुलाला सरकारी नोकरी मिळावी, ही इच्छा अपूर्णच राहिली. त्यांच्या पश्चात ९५ वर्षीय पत्नी, मुलगा, विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. प्रशासनाच्यावतीने तहसीलदार मिलिंद वाघ यांनी तर पोलिसांच्यावतीने पो. नि. दिलीप भागवत यांनी पुष्पचक्र अर्पण केले.