भुसावळ : शहरातील विस्तारित शहरी भागाला जोडणाऱ्या महामार्गावरील लोकसंख्या व रहदारी पाहता अंडरपास मिळावे याकरिता वेळोवेळी मागणी करण्यात आली होती. अखेर यास महामार्ग प्राधिकरणातर्फे मंजुरी मिळाल्याचे पत्र प्राप्त झाल्याने या भागातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.नाहाटा चौफुली पुढे रेल्वे उड्डाण पुलाच्या आधी शहराच्या विस्तारित व वाढीव भाग असलेल्या सिंधी कॉलनी, श्रीराम नगर, चक्रधर नगर, दत्तनगर, चमेली नगर, बद्रीनाथ प्लॉट यासह अनेक भागांना राष्ट्रीय महामार्गापासून वांजोळा मार्गाचा वापर सोयीचे होते, मात्र महामार्ग चौपदरीकरण होत असल्याने या ठिकाणी अंडर पास न दिल्यामुळे या भागातील राहणाऱ्या नागरिकांना मोठी गैरसोय झाली होती. याबाबत माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे, प्रा.सुनील नेवे, पुरुषोत्तम नारखेडे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जलसंधारण, जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांना प्रत्यक्ष भेटून या ज्वलंत समस्येविषयी सविस्तर माहिती दिली होती व याबाबतची शहानिशा करून अखेर महामार्ग प्राधिकरणातर्फे याठिकाणी अंडरपास मिळण्याची मंजुरी मिळाली आहे. यासाठी प्रभागातील नगरसेविका शोभा अरुण नेमाडे, महेंद्रसिंह ठाकूर, पुरुषोत्तम नारखेडे, दिनेश नेमाडे, निर्मल कोठारी, अँड.बोधराज चौधरी, रमेश नागराणी, निकी बत्रा, सोनी संतोष बारसे, प्रमोद पाटील, स्वप्नील भारंबे, नितीन इंगळे, रवी ढगे, शैलेश बराटे यांनी सातत्याने पाठपुरावा केला अखेर त्याला यश प्राप्त झाले आहे. लवकरच या ठिकाणी अंडरपास निर्मिती होणार आहे. यामुळे या प्रभागात या हद्दीतील शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भुसावळात विस्तारित भागाला जोडणाऱ्या महामार्गावरील वांजोळा रस्त्याच्या अंडरपासला अखेर मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 9:08 PM