लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कर्मचाऱ्यांची कुठलीही पूर्व परवानगी न घेता त्यांची सेवापुस्तिकेची गोपनीय माहिती शिक्षण संचालक कार्यालयाला पाठविल्याचा आरोप करीत डॉ. शामकांत भादलीकर यांनी प्रभारी कुलसचिव पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी सलग दोन दिवस शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी कृती समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला यश आले असून मंगळवारी सायंकाळी स्वत: हून डॉ.शामकांत भादलीकर यांनी प्रभारी कुलसचिवपदाचा राजीनामा दिला आहे. बुधवारी प्रा.डॉ.ए.बी़ चौधरी यांना प्रभारी कुलसचिव पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे.
पदनामबद्दल केलेले शासन निर्णय शासनाने रद्द केल्यामुळे बाधित कर्मचारी व अधिकारी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यामध्ये डॉ. शामकांत भादलीकर यांचाही समावेश आहे. असे असताना सुद्धा कर्मचाऱ्यांची सेवापुस्तिकेची गोपनीय माहिती भादलीकर यांनी शिक्षण संचालक कार्यालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सुयश दुसाने यांना पाठविली असल्याचा आरोप उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी कृती समितीने केला होता. नंतर भादलीकर यांनी प्रभारी कुलसचिव पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी कृती समितीच्या वतीने सोमवार आणि मंगळवारी प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. अखेर कृती समितीच्या आंदोलनाला यश आले आहे. मंगळवारी सायंकाळी कार्यालयीन वेळेनंतर डॉ.शामकांत भादलीकर यांनी स्वत:हून प्रभारी कुलसचिव पदाचा राजीनामा दिला.
समन्वयक अधिकारी पदाचाही राजीनामा
डॉ. भादलीकर यांनी प्रभारी कुलसचिव पदासोबत कुलगुरू निवड प्रक्रियेसाठी शोध समितीवरील समन्वयक अधिकारी पदाचा राजीनामा सुद्धा दिला असून बुधवारी त्यांनी उपकुलसिचव व विधी व माहिती अधिकार या मूळ पदावर ते पुन्हा रुजू झाले आहेत. दुसरीकडे प्रभारी कुलसचिव पदाचा पदभार हा प्रा.डॉ.ए.बी.चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे़
---------------
प्रभारी कुलसचिव पदाच्या राजीनाम्यामुळे विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग लागू होणार असेल तर मी स्वत: हून कर्मचाऱ्यांचे हित जोपासण्याच्या दृष्टीने प्रभारी कुलसचिव व समन्वयक अधिकारी पदाचा राजीनामा देत आहे. पूर्वीच्या उपकुलसचिव व विधी व माहिती अधिकार या पदावर रुजू झालो आहे. तर शासनाला माहिती उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य व जबाबदारी असून त्यात गैर काहीही नाही.
- डॉ. शामकांत भादलीकर, प्रभारी कुलसचिव, विद्यापीठ
-------------------
कृती समितीच्या आंदोलनाला यश आले आहे. कुलगुरू यांनी डॉ. शामकांत भादलीकर यांचा प्रभारी कुलसचिव पदाचा राजीनामा घेतला असून आता त्या जागी प्रा.डॉ.ए.बी.चौधरी यांची नियुक्ती केली आहे.
- भैय्यासाहेब पाटील, सचिव, कृती समिती