शिवाजी नगरात नवीन विद्युत खांब बसविले
जळगाव : महावितरणतर्फे शिवाजी नगरातील भुरे प्लॉट भागात जुने सिमेंटचे विद्युत खांब वाकल्यामुळे, या ठिकाणी शनिवारी नवीन सिमेंटचे खांब बसविण्यात आले. पावसाळ्याच्या तोंडावर खबरदारी म्हणून महावितरणतर्फे हे खांब बदलविण्यात आले. या बाबत नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी महावितरण प्रशासनाकडे तक्रार केली होती.
मालगाड्यांमुळे एक्सप्रेस गाड्यांना विलंब
जळगाव :रेल्वे प्रशासनातर्फे सध्या प्रवासी गाड्यांसोबत मालगाड्याही मोठ्या प्रमाणावर चालविण्यात येत आहेत. या गाड्यांची संख्या वाढली असल्यामुळे, याचा परिणाम प्रवाशी गाड्यांच्या वाहतुकीवर होत आहे. त्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरच्या काही अर्धा ते एक तासांपर्यंत विलंबाने धावत आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
गोलाणी मार्केटसमोर वाहतुक कोंडी
जळगाव : शनिवारचा बााजार असल्यामुळे नागरिकांची शहरातील गोलाणी मार्केटमध्ये खरेदीसाठी सकाळपासूनच गर्दी होती. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनी रस्त्यावरच वाहने उभी केल्यामुळे, दुपारी एक ते दोन च्या सुमारास या ठिकाणी मोठ्या कोंडीची समस्या उद्भवली. यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडतांना तारेवरची कसरत करावी लागली. तरी वाहतूक विभागाने दर शनिवारी या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांमधुन केली जात आहे.
शिवसेनेतर्फे रक्तदान शिबिर
जळगाव : शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी बळीराम पेठ शाखेतर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक सुनील माळी, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे समन्वयक जितेंद्र गवळी, महेश पाटील, रूपेश पाटील, विपीन पवार, रमेश जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.