लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविडपेक्षा सारीने अधिक मृत्यू होत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात होते, मात्र, प्रत्यक्षात आकडेवारी मात्र, प्रशासनाकडे उपलब्ध नव्हती, मात्र, सोमवारी प्रथमच शासकीय अहवालात प्रशासनाकडून सारी व कोरोना संशयित रुग्णांची माहिती जाहीर केली असून या माहितीनुसार जिल्ह्यात अशा १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जळगाव शहरात नव्या २३६ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय मृत्यूची संख्या व नेरी नाका स्मशानभूमीत होणारे अंत्यसंस्कार यात तफावत समोर आली होती. ‘लोकमत’ने १० एप्रिल रोजी याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर सारीच्या मृत्यूची संख्या अधिक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. रविवारी जळगावच्या नेरीनाका स्मशानभूमीत सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत तब्बल ३८ मृतांवर अंत्यंसस्कार करण्यात आले होते. मात्र, शासकीय अहवाला दिवसभरात २२ मृत्यूची नोंद होती. त्यामुळे हे मृत्यू नेमके कशामुळे हा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर प्रशासनाने सोमवारी १८ मृत्यू हे सारी, कोरोना संशयित व पोस्ट कोविडचे असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
मृत्यूचा सलग दुसऱ्या दिवशी उच्चांक
कोरोना बाधितांचे मृत्यू दिवसेंदिवस वाढतच आहे. यात रविवारच्या २२ मृत्यूच्या उच्चांकानंतर सोमवारी २४ बाधितांचे मृत्यू झाले. एका दिवसात कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची ही सर्वाधिक संख्या आहे. जळगाव शहरात व चोपडा अशा ठिकाणी मृत्यू सातत्याने होतच असून प्रशासनासमोर हे मृत्यू थांबविणे हे मोठे आव्हान आहे.
ऑक्सिजनची स्थिती आवाक्यात
ऑक्सिजनची टंचाई असली तरी स्थिती मात्र, आवाक्यात असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढल्याने तुटवड्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, हळू हळू ऑक्सिजनच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यात येत असून ही स्थिती आता आवाक्यात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
रेमडेसिविरची आणिबाणी कायम
ग्रामीण शासकीय यंत्रणेतील रेमडेसिविरचा साठा येत्या दोन दिवसांपुरताच असून जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. अडीच हजार इंजेक्शनची मागणी नोंदविण्यात आली आहे. मात्र, ती कधी येईल, हे निश्चित नसल्याचे चित्र आहे.
ऑक्सिजनवरील रुग्ण वाढले
सक्रीय रुग्ण १११०७
लक्षणे असलेले ३५०९
लक्षणे नसलेले ७५९८
ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागणारे रुग्ण १६६३
अतिदक्षता विभागातील रुग्ण ८५३