लोकमत न्यूज नेटवर्कअमळनेर : पाळीव डुकरांच्या उपद्रवाने शहरात कॉलनी वसाहतीलगत शेतशिवारात पिकांचा मोठ्या प्रमाणात फडशा पाडून शेतकऱ्यांची मका, ज्वारी आदी पिके उध्वस्त झाली असताना,पालिका अधिकारी, शेतकरी व डुकरे मालक यांच्या बैठकीतील निर्णयानुसार डुकरे मालकांच्या सहकार्याने १०० डुकरे काल शहरात पकडण्यात येऊन वाहनात टाकून ठाण्यांकडे रवाना करण्यात आली.यावेळी न. प. चे प्रशासन अधिकारी संजय चौधरी, आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे व डुकरे मालक किशोर जाधव, विक्की जाधव व न. प. कर्मचारी उपस्थित होते. आर. के. नगर भागात ही पकडलेली डुकरे एकत्र करून वाहनाद्वारे रवाना करण्यात आली. मालक जाधव यांनी ही डुकरे मुंबईकडे विकली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी तहसिलदार कार्यालयात मुख्याधिकारी आणि डुक्कर मालक व शेतकरी यांची बैठक झाली होती.यावेळी तहसीलदार मिलिंद वाघ, मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बिऱ्हाडे, शेतकरी नेते शिवाजी पाटील यावेळी उपस्थित होते. शहरातील शेतकऱ्यांनी तहसीलदार, पालिकाना निवेदन देऊन डुकरांच्या उपद्रवामुळे नुकसानभरपाईची मागणी केली होती. शहरातील पिंपळे रोड ढेकू रोड आणि गलवाडे रस्ता तांबेपुरा, मंगरूळ शिवार या भागात डुकरांनी उच्छाद मांडला होता. परिसरातील शेतकरीवर्ग अखेर कंटाळून तहसिलदार कार्यालय आवारात जमले होते.दरम्यान, यावर्षी दोन तीनवेळा पालिकेने डुक्करमालकांना नोटीसा बजावल्या होत्या. मात्र शहरातून एकही डुक्कर हद्दपार झालेले नव्हते. डुक्कर मालक दोन पथके तयार करून सोमवारपासून डुकरे पकडून बाहेरगावी पाठवण्यात येतील, असा निर्णय बैठकीत झाला होता. यानुसार काल डुकराची धरपकड करण्यात येऊन विल्हेवाट लावण्यात आली आहे.
अखेर मालकांच्या मदतीने पाळीव डुकरे मुंबईकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 10:43 PM
डुकरे मालकांच्या सहकार्याने १०० डुकरे काल शहरात पकडण्यात येऊन वाहनात टाकून ठाण्यांकडे रवाना करण्यात आली.
ठळक मुद्देअमळनेर : नागरिक आणि शेतकरी यांना मिळाला दिलासा, दोन पथकेे केली होती तयार