लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपा प्रशासनाकडून उशिरा का होईना अखेर शहरातील मुख्य पाच नाल्यांच्या साफसफाईला गुरुवार पासून सुरुवात करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाईच्या कामांना दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात केली जाते. मात्र, यावर्षी आठवडाभराच्या उशिराने मुख्य नाल्यांचा साफसफाईला सुरुवात केली असून, ७ जुनपर्यंत या नाल्यांची सफाईचे काम पूर्ण करावे लागणार आहे.
मेहरूण परिसर आणि श्रद्धा कॉलनीतील नाले सफाईच्या कामाची गुरुवारी सकाळी महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी प्रत्यक्षात पाहणी करीत सुचना दिल्या. त्यानंतर मनपा प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने नालेसफाईस सुरुवात केली आहे. यावेळी प्रभाग समिती अधिकारी आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. शहरातील सर्व मुख्य नाले आणि उपनाल्यांची सफाई योग्य पध्दतीने आणि लवकरात लवकर पूर्ण करावी. तसेच नाल्याकाठी असलेले अतिक्रमण हटविण्यासंदर्भात संबंधित विभागाला कळवावे, अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी दिल्या आहेत.
१०९ धोकादायक इमारतींना मनपाकडून नोटिस
पावसाळ्यात अनेक जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने शहरात सर्वेक्षण करून काही धोकादायक इमारती शहरात असल्याचे आढळून आले आहे. अशा १०९ धोकादायक इमारतींना मनपा प्रशासनाने नोटीस बजावली असून, पावसाळा आधीच दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित इमारत मालकाला देण्यात आल्या आहेत. अन्यथा महापालिकेकडून या इमारती तोडल्या जातील असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे.
मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेणार महापौर
शहरात १० जून पर्यंत मान्सूनचे आगमन होत असते. तसेच त्या आधी मान्सून पूर्व पावसात देखील नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. या पार्श्वभूमीवर महापौर व उपमहापौर मनपाकडून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेणार आहेत. तसेच पावसाळ्यात साथीचे आजार देखील पसरण्याची भीती असते, त्या पार्श्वभूमीवर देखील फवारणी, सर्वेक्षण व इतर बाबींची पूर्तता करण्याबाबत महापौर आढावा घेणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.