नशिराबाद : येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बी.एस.पाटील यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अर्जाचा माफीनामा सादर केला. गावातील नागरिकांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांबाबत षड्यंत्र रचून त्यांच्या विरोधात निवेदन सादर करून घेतले, असा धक्कादायक खुलासा कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे दिलेल्या माफीनाम्यात केला आहे.
ग्रामपंचायतमधील अस्थायी कर्मचारी पूनम मर्दाने, राकेश मर्दाने, विजय जाधव हे तिघे जण काम करीत होते. दिवाळीदरम्यान ग्रामविकास अधिकाऱ्यांना पगाराची मागणी केली. पगार बँकेच्या खात्यात जमा होईल, असे त्यांनी सांगितले होते; मात्र ग्रामपंचायत कार्यालयात वाद घालून पगाराची मागणी करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता.
याविषयी आता कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे की, ग्रामविकास अधिकारी पाटील यांनी अस्थायी कर्मचारी असल्याने आम्हा तिघांना काही दिवस कामावरून काढण्याचा निर्णय घेतला होता. याचा राग मनात ठेवून द्वेष बुद्धीने गावातील दोन-तीन नागरिकांच्या म्हणण्यावरून गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात जिल्हा परिषदेकडे निवेदने सादर केली व त्यांना निलंबित करून आम्हाला कामावर रुजू करण्याची मागणी वरिष्ठांकडे केली होती. सर्व कृत्य आम्ही तिघांनी अनवधानाने व एक-दोन जणांच्या सांगण्यावरून व ग्रामपंचायतमध्ये सुरळीत चाललेल्या कामकाजाला अडथळा निर्माण होण्याच्या उद्देशाने केले व बी.एस.पाटील यांच्याविरोधात गावात सुरू असलेल्या षड्यंत्रास पुष्टी मिळण्यासाठी आम्हाला त्यांच्या विरोधात अर्ज देण्यास प्रवृत्त केले, असा धक्कादायक खुलासा निवेदनात कर्मचाऱ्यांनी नमूद केला आहे. आम्ही केलेल्या खोट्या आरोपांबाबत माघार घेऊन त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारची तक्रार व द्वेष नसल्याचा खुलासा कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. त्यामुळे गावात सुरू असलेल्या राजकारणाला एक वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकाराबद्दल गावात चर्चांना उधाण आले आहे.