लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोविड रुग्णांची संख्या घटल्यानंतर आता परिस्थिती लक्षात घेता, या ठिकाणी नॉन कोविड अर्थात कोरेानाव्यतिरिक्त आजारांवर उपचार सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गुरुवार २२ जुलैपासून या ठिकाणी नॉन कोविड रुग्ण सेवा पूर्ववत सुरू होणार असून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी याबाबत सोमवारी आदेश काढले आहेत. दरम्यान, मोहाडी रुग्णालयातील आयसीयू सेवा कार्यान्वित होईपर्यंत जीएमसीत गंभीर कोविड रुग्णांसाठी आयसीयूची सेवा राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
दुसरी लाट ओसरत असल्याने हे रुग्णालयत नॉन कोविड करण्यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना कळविले होते. शिवाय नुकतीच जीएमसीत वैद्यकीय परिषदेची बैठक होऊन नॉन कोविड करण्यासंदर्भात तसेच कोरोना रुग्ण मोहाडी येथे हलविण्यासंदर्भात प्रस्ताव जिल्हाधिकारी राऊत यांना पाठविण्यात आला. त्यानंतर तातडीने जिल्हाधिकारी राऊत यांनी या ठिकाणी २२ जुलैपासून २०२१ पासून हे रुग्णालय नॉन कोविड घोषित करण्यात येत असल्याचे आदेश काढले आहे.
मोहाडीत आयसीयूची व्यवस्था नाही
मोहाडी रुग्णालयात अद्याप आयसीयूची व्यवस्था अद्याप कार्यान्वित नसल्याने ही यंत्रणा कार्यान्वित होईपर्यंत कोविडच्या गंभीर रुग्णांसाठी जीएमसीत आयसीयू राखीव ठेवण्यात येणार असून त्यानंतर मोहाडी येथे हे रुग्ण हलविण्यात येणार आहेत. तोपर्यंत ही व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांना देण्यात आल्या आहेत.
आज बैठक
नॉन कोविडचे आदेश आल्यानंतर आता या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांनी दिली. यात रुग्णालयात तीन आयसीयू असून प्राथमिक स्तरावर जुना आयसीयू हा कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येऊ शकतो, मात्र याबाबत बैठकीतच निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपत्कालीन विभागातील आयसीयू आणि बालकांचा स्वतंत्र आयसीयू राहणार आहे.
कोरोनामुळे चार आदेश
५ एप्रिल २०२० रोजी जीएमसीत पूर्णत: कोविड रुग्णालयाची घोषणा
१७ डिसेंबर २०२० रोजी पुन्हा नॉन कोविड सुरू
२० मार्च २०२१ रोजी पुन्हा कोविडची घोषणा
२२ जुलैपासून नॉन कोविड सेवा पूर्ववत होणार
सद्यस्थितीत असलेले रुग्ण
कोविड ११
आयसीयू ०५
शिशू विभागात ०९ संशयित
म्यूकरमायकोसिस ११
जीएमसीची क्षमता अशी आहे
एकूण ऑक्सिजन बेड ३८६
आयसीयू बेड ६४
नॉन आयसीयू बेड ३२२
व्हेंटिलेटर पीएम केअर ८०
व्हेंटिलेटर नॉन पीएम केअर ४७
कोट
‘‘कोरोना सोडून इतर आजारांवर उपचार करण्यासाठी सामान्य नागरिकांची गैरसोय होत होती. आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोरोनाविरहित सेवा देण्यासाठी पूर्ण क्षमतेने तयार झाले आहे. नागरिकांना २१ विविध विभागाद्वारे वैद्यकीय सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नागरिकांनी रुग्णालय प्रशासनाला सहकार्य करून ‘नॉन कोविड’ रुग्णसेवेचा लाभ घ्यावा.’’
- डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता